झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १९ वर्षाखालील आयसीसी पुरूष वनडे विश्वचषक सुरू आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारताचा स्फोटक सलामीवीर वैभव सुर्यवंशी याच्या धमाकेदार फलंदाजीची एकच चर्चा सुरू झाली होती. त्याने मागील अनेक सामन्यात मोठी खेळी करत अनेकांचे विक्रम मोडले आहेत. आता त्याचाच एक विक्रम मोडला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर-अष्टपैलू विल मालाज्सुक याने जपानविरुद्ध तुफानी खेळी करत वैभवला मोठ्या विक्रमात मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध जपान यांच्यात २० जानेवारीला सामना खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सलामीला आलेल्या विलच्या शतकी खेळीमुळे सामना ८ विकेट्सने जिंकला. यामध्ये विलने २०२ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने नितेश सॅम्युएलच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ९३ चेंडूत १३५ धावांची भागीदारी करत शतकही पूर्ण केले.
विल १९ वर्षाखालील वनडे प्रकारात सर्वात जलद १०० धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. याआधी वैभव दुसऱ्या स्थानी होता. विलने ५१ चेंडूत शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने १२ चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचबरोबर ही १९ वर्षाखालील पुरूष वनडे विश्वचषकाच्या इतिहासातीलही सर्वात जलद शतकी खेळी ठरली आहे.
वैभवने वनडेत ५२ चेंडूत शतक केले होते. त्याने ही कामगिरी २०२५मध्ये इंदौरमध्ये ७८ चेंडूत १४३ धावांची खेळी करत केला होता. यामध्ये त्याने १३ चौकार आणि १० षटकार मारले होते. तसेच त्याने यूथ वनडेमध्ये युएईविरुद्ध (५६ चेंडू) आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध (६३ चेंडू) शतके केली आहेत.
पुरूषांच्या १९ वर्षाखालील वनडे प्रकारात सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमाच्या यादीत पाकिस्तानचा समीर मिन्हास पहिल्या स्थानावर आहे. त्याने याचवर्षी झिम्बाब्वे विरुद्ध ४२ चेंडूत शतक पूर्ण केले होते. हरारे येथे झालेल्या त्या सामन्यात समीरने ५१ चेंडूत ११४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये १७ चौकार आणि ५ षटकांराचा समावेश आहे.






