आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिला विश्वचषक (U19 T20 World Cup)आयोजित केला आहे. ही स्पर्धा टी20 स्वरुपाची असून दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. त्यामध्ये भारताने यजमानांचा पराभव करत चांगली सुरूवात केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताच्या विजयाचे मुख्य कारण श्वेता सेहरावत ठरली. तिने 57 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. ती या विश्वचषकात खेळली नसती जर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी तिला वेळेवर समजावले नसते.
झाले असे की, मागील वर्षी श्वेताने नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे (एनसीए) अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये तिने बारावीच्या परिक्षेमुळे 15 मे ते 9 जून दरम्यान 19 वर्षाखालील महिला कॅम्पमध्ये सहभाग घेता येणार नाही, असे लिहिले होते. लक्ष्मण यांनी श्वेताच्या फलंदाजीबाबत ऐकले होते यामुळे त्यांना काही दिवस तरी कॅम्पमध्ये सहभागी हो, असे सुचविले. यानंतर ती 3 जूनपासून कॅम्पला आली. तिने काही सामनेही खेळले.
पुढे लक्ष्मण यांचा हाच निर्णय कामी आला आणि भारताने पहिल्याच सामन्यात उत्तम कामगिरी केली. श्वेताचे वडिल माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही अपेक्षाच सोडली होती. हे सर्व लक्ष्मण सरांमुळे घडले. त्यांनी आमच्याशी चर्चा केली.
19 वर्षाखालील विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 20 षटकात यजमानांनी 5 विकेट्स गमावत 166 धावा केल्या. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा सिमॉन लॉरेन्स हीने केल्या. तिने 44 चेंडूत 61 धावा केल्या तर भारताकडून कर्णधार शेफाली वर्मा हिने 4 षटकात 31 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्वेताने सलामीला येत 161.40च्या स्ट्राईक रेटने 92 धावा केल्या. त्याचबरोबर शेफालीनेही 16 चेंडूत 45 धावांची ताबडतोब फलंदाजी केली आणि भारताने 7 विकेट्सने सामना जिंकला. या स्पर्धेत भारत डी ग्रुपमध्ये असून दक्षिण आफ्रिकेबरोबर युनायडेट अरब अमिराती आणि स्कॉटलंड हे संघ आहेत. भारताचा पुढील सामना सोमवारी (16 जानेवारी) युएईविरुद्ध आहे.
(U19 T20 WC INDvSA Shweta Sehrawat to skip trials for board exam VVS Laxman convinced her)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ते अंपायरचे काम आहे खेळाडू आऊट…’, रोहितच्या अपील मागे घेतल्याच्या निर्णयावर अश्विनची तीव्र नाराजी
ईशान, सूर्या बाकावर का? या प्रश्नावर बॅटींग कोच राठोडने अखेर तोडले मौन