पोचेफस्टरूम| आज(9 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज भारतीय संघ विक्रमी 5 वे 19 वर्षांखालील विश्वविजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला आहे. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
यावर्षीच्या विश्वचषकात भारताने आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून हे सर्व 5 सामने जिंकले आहेत. या प्रवासाचा हा थोडक्यात आढावा –
साखळी फेरी – गट अ – भारत विरुद्ध श्रीलंका
या सामन्यात भारताने 90 धावांनी विजय मिळवत या विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल, कर्णधार प्रियम गर्ग आणि उपकर्णधार ध्रुव चंद जुरेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 4 बाद 297 धावा केल्या आणि श्रीलंकेला 298 धावांचे लक्ष्य दिले.
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा डाव 45.2 षटकात केवळ 207 धावा करता आल्या.
साखळी फेरी – गट अ – भारत विरुद्ध जपान
या सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना 41 धावा केल्या होत्या आणि भारताला 42 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी (3), आकाश सिंग (2) आणि विद्याधर पाटीलने (1) विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 42 धावांचे आव्हान भारताने एकही विकेट न गमावता अवघ्या 4.5 षटकात पूर्ण करत सामना जिंकला. भारताकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने 18 चेंडूत सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या, तर कुमार कुशग्रने नाबाद 13 धावांची खेळी केली.
साखळी फेरी – गट अ – भारत विरुद्ध न्यूझीलंड
या सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 44 धावांनी विजय मिळवला आणि साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकावले.
या सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाने अर्धशतकी खेळी केल्यानंतर पावसामुळे सामना थांबला. अखेर डकवर्थ लूईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर 23 षटकात 192 धावांचे आव्हान देण्यात आले. पण रवी बिश्नोई आणि अथर्व अंकोलेकरच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडला 21 षटकात सर्वबाद 147 धावाच करता आल्या. बिश्नोईने 4 विकेट्स तर अंकोलेकरने 3 विकेट्स घेतल्या.
उपांत्यपूर्व सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 234 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 62 धावांची तर अथर्व अंकोलेकरने नाबाद 55 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच रवी बिश्नोईने 30 धावांची छोटेखानी खेळी केली होती.
त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 43.3 षटकात सर्वबाद 159 धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना त्यागीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश सिंगने 3 विकेट्स आणि रवी बिश्नोईने 1 विकेट घेतली.
उपांत्य सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान
भारताने हा सामना 10 विकेट्सने जिंकत सलग तिसऱ्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा कारनाना केला. या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने नाबाद शतकी खेळी केली. तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पाकिस्तानने 43.1 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या आणि भारताला 173 धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून गोलंदाजी करताना सुशांतने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या होत्या.
त्यानंतर 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जयस्वालने नाबाद 105 आणि सक्सेनाने नाबाद 59 धावा करत भारताला 10 विकेट्सने विजय मिळवून दिला.
असा आहे टीम इंडिया आण १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा इतिहास
वाचा👉https://t.co/1UFSxJmOtZ👈#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
सचिन, विराटसह या दिग्गजांनी दिल्या १९ वर्षांखालील टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलसाठी शुभेच्छा
वाचा👉https://t.co/TRuVPZLSa0👈#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020