---Advertisement---

फायनलपूर्वी व्हिडिओ कॉलवर वडिलांशी काय झालं कर्णधार यशचं बोलणं? संघाच्या प्लॅनचाही कोचकडून खुलासा

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 1:28 PM
Yash-Dhull-In-PC
---Advertisement---

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेली १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा (Under 19 World Cup) अंतिम टप्प्यात आली आहे. या संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक दिली आहे. शनिवार रोजी (०५ फेब्रुवारी) अँटिग्वा येथे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना (U19 World Cup Final) रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार यश धूल (Yash Dhull) याला त्याचे प्रशिक्षक प्रदीप कोचर (Yash Dhull’s Coach) यांनी विशेष सल्ला दिला आहे. त्याबरोबरच यशला या महत्त्वाच्या लढतीपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला दिलेल्या सल्ल्या (Father’s Advice) बाबतही सांगितले आहे. 

यशचे प्रशिक्षक प्रदीप यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले आहे की, मी यशला हे म्हणालो की, जर भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी निवडली, तर त्यांनी पूर्ण ५० षटके खेळण्याचा प्रयत्न करावा. यशने ज्याप्रकारे उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावाची उभारणी केली होती. अपेक्षा करतो की, अंतिम सामन्यातही तो असेच काही खास करेल. तो त्याच्या वयाच्या मानाने खूप समंजस फलंदाज आहे. 

तसेच यशचे वडिल विजय सिंग यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा यश विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. तेव्हा त्याला क्वारंटाईन केले गेले होते. यादरम्यान आम्ही त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला रोज व्हिडिओ कॉल करत असायचो. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि ऋषिकेश कानिटकरसह १९ वर्षांखालील संघातील सपोर्ट स्टाफमधील सर्व लोक त्याला सातत्याने व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत असायचे. तसेच अंतिम सामन्यापूर्वी मी सुद्धा त्याच्यासोबत ३-४ मिनिट बोललो आहे. मी त्याला म्हणालो आहे की, जर तम्ही अपेक्षेप्रमाणे खेळलात तर नक्कीच ट्रॉफी घेऊन याल, असेही ते पुढे म्हणाले.

भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याची ही सलग चौथी आणि एकूण आठवी वेळ आहे. भारतीय संघ आतापर्यंत ७ वेळा अंतिम सामन्यात धडक मारत त्यापैकी ४ वेळा विजेतेपद मिळवू शकला आहे. तर ३ वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२ आणि २०१८ यावर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तर २००६, २०१६ आणि २०२० ला भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---