अबु धाबी। एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत आज (१० जानेवारी) भारताला यजमान अरब अमिरातीकडून ०-२ असा पराभव स्विकारावा लागला. या विजयामुळे अरब अ गटात पहिल्या स्थानावर पोहचले आहेत.
या सामन्यास भारताने चांगली सुरूवात केली होती. मात्र त्यांनी काही संधीही सोडल्या ज्यामुळे त्यांना आघाडी घेता आली नाही. पहिले सत्र संपण्यास चार मिनिटे बाकी असताना अरबच्या खलफन मुबारकने गोल केला. ८८व्या मिनिटाला अली मबखोतने दुसरा गोल करत विजय पक्का केला.
मागील सामन्यात स्टार ठरलेला सुनिल छेत्री, संदेश झिंगन आणि आशिक कुरूनियान यांना या सामन्यात गोलकिपर खालिद इसाची भिंत मोडण्यास अपयश आले.
पहिल्या सत्रातच भारताने दोन सुवर्ण संधी दवडल्या. १२व्या मिनिटाला कुरूनियानच्या शॉटला खालिद बिलालने उत्तमप्रकारे रोखले. तर २३व्या मिनिटाला उदांता सिंगने अनिरुद्ध थापाकडे केलेल्या पासवर छेत्रीला गोल करण्यात अपयश आले. मात्र मुबारकला भारताची सुरक्षाफळी मोडण्यास यश आले. यामुळे या सत्रात त्यांना १-० अशी आघाडी मिळाली.
४४व्या मिनिटाला छेत्रीचा सामना बरोबरी करण्याचा प्रयत्न सुरूच होता. मात्र यामध्ये त्याला यश आले नाही.
दुसऱ्या सत्राला अरब संघाने आक्रमक सुरूवात केली. तर भारतानेही चांगली सुरूवात केली. थापाकडून मिळालेल्या फ्रि-कीकवर जेजे लापेखलुआला गोल करण्याची संधी असताना त्याचा निशाणा चुकला.
या सत्रात भारताचे गोल करण्याचे प्रयत्न सुरूच होते पण त्यांनी अरबलाही आघाडी घेण्यापासून रोखले होते. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना मुबारकने अरबकडून दुसरा गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून देताना सामनाही जिंकून दिला.
या पराभवामुळे भारताचे बाद फेरीत जाण्याचे आव्हान वाढले आहे. थायलंडने बहरीनला पराभूत केले असल्याने ते गुणतालिकेत तळाला पोहचले आहे. भारताचा पुढील सामना बहरीन विरुद्ध असल्याने त्यांना यामध्ये जिंकणे खूप गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–पहिल्या वनडे सामन्यात या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी
–मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान
–खेलो इंडिया: पंधराशे मीटर धावण्यात महाराष्ट्राचा सौरभ रावत विजेता; उंच उडीत धैर्यशीलचे रुपेशी यश