सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील तीन सामने पार पडले असून भारतीय संघ मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना येत्या ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा सामना देखील याच स्टेडियमवर खेळवला गेला होता, ज्यात भारतीय संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता.
आता चौथा सामना जिंकल्यास भारताला ३-१ अशा फरकाने मालिका खिशात घालण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे हा सामना जिंकल्यास किंवा किमान अनिर्णीत ठेवल्यास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा असेल. मात्र या सामन्यातून भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या कसोटीत अंतिम अकराच्या संघात कोणाला स्थान द्यायचे, असा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे.
उमेश यादव की मोहम्मद सिराज?
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाल्यापासून संघाबाहेर होता. मात्र आता दुखापतीतून सावरल्यानंतर तिसऱ्या कसोटीआधी त्याचा संघात समावेश केला गेला. त्यामुळे चौथ्या कसोटीत बुमराहच्या जागी त्याला संधी दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
खरंतर युवा मोहम्मद सिराजने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळली होती. मात्र चेन्नई येथील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला फार विशेष कामगिरी करता आली नाही. तसेच उमेश यादवचा विचार केला असता भारतीय खेळपट्ट्यांवर त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. अशा परिस्थितीत सिराजच्या आधी उमेश यादवला पसंती दिल्या जाण्याची शक्यता आहे.
उर्वरित संघात होणार का बदल?
चौथ्या कसोटीत या एका बदलासह उर्वरित संघात भारतीय संघ फारसा बदल करेल, अशी शक्यता नाही. फलंदाजी फळी आत्तापर्यंत या मालिकेत फारशी चमकली नसली तरी अनुभवी फलंदाज असल्याने त्यांच्यावर संघ व्यवस्थापन आपला विश्वास कायम ठेवेल. तसेच आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा हे गोलंदाज आपल्या भूमिकेला न्याय देत असल्याने त्यांच्या जोडीला अष्टपैलू म्हणून वाॅशिंग्टन सुंदरलाच संघात कायम ठेवले जाईल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! लखनऊ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
संतापजनक! ऍरॉन फिंचच्या खराब कामगिरीनंतर चाहत्याने पत्नीला दिली धमकी, आक्षेपार्ह भाषेचा केला वापर
मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी