भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवार रोजी (३१ ऑक्टोबर) दुबई येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा २८ वा सामना पार पडला. उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन अतिशय निराशादायी राहिले. प्रथम फलंदाजी करताना त्यांना केवळ ११० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताचे गोलंदाजही धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले आणि न्यूझीलंडने १५ षटकातच ८ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला.
भारतीय खेळाडूंच्या फ्लॉप प्रदर्शनाव्यतिरिक्त अजून एक दुर्दैवी गोष्ट त्यांच्या पराभवाचे कारण ठरली आहे. ती म्हणजे, या सामन्यातील मैदानी पंच रिचर्ड केटलब्रॉ यांची उपस्थिती.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत आयसीसीच्या नॉकआऊट (बाद फेरी) सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु त्यांना जेतेपद पटकावता आले नाहीये. यामागील प्रमुख कारण पंच रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रिचर्ड केटलब्रॉ यांनी भारतीय संघाच्या अनेक नॉकआऊट सामन्यात पंचगिरी केली आहे, ज्यामध्ये भारतीय संघाला अखेरच्या क्षणी विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये करावा लागला पराभवाचा सामना
साल २०१४ पासून जेव्हा जेव्हा भारतीय संघाने आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांचे नॉकआऊट सामने खेळले आहेत, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. भारतीय संघाने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने त्यांना पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात देखील रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. त्यांनतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
इतकेच नव्हे तर रिचर्ड केटलब्रॉ हे पंच असताना भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात, पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या २०१९ विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सर्व महत्त्वांच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघासाठी पंच रिचर्ड केटलब्रॉ दुर्दैवी ठरले आहेत.
याखेरीज रिचर्ड केटलब्रॉ पंच असलेल्या दर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० विश्वचषक सामन्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. पंच रिचर्ड केटलब्रॉ यांच्या उपस्थितीत भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा मन तुटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जखमेवर मीठ! मोठ्या फटक्याच्या नादात कोहली झेलबाद, कॅच टिपल्यानंतर बोल्टने ‘अशी’ उडवली खिल्ली
दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! असगर अफगाणला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ
हार्दिकच्या नावावर ‘मोठा’ विक्रम, यापूर्वी केवळ युवराज सिंगला जमलाय ‘असा’ पराक्रम