मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ४० वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स संघात बुधवारी (२७ एप्रिल) पार पडला. हा सामना गुजरातने ५ विकेट्सने जिंकला. गुजरातचा हा सातवा विजय ठरला, याबरोबरच त्यांनी सध्या गुणतालिकेत अव्वल स्थान देखील काबीज केले आहे. मात्र, असे असले तरी हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने बुधवारी सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेत सामनावीर पुरस्कारही जिंकला.
उमरान मलिकची घातक गोलंदाजी
उमरान मलिकने (Umran Malik) या सामन्यात चांगलीच घातक गोलंदाजी केली. त्याची गोलंदाजी पाहून हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन हा देखील खुश झाल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात हैदराबादने १९६ धावांचे आव्हान गुजरात समोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने ५ विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे या सर्व ५ विकेट्स उमरानने घेतल्या. त्याला अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी ६९ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली सुरुवात केली होती. मात्र, उमरानने त्यांची जोडी तोडली. यावेळी त्याने जेव्हा ताशी १४४ किमी वेगाने चेंडू टाकत ८ व्या षटकात शुबमन गिलला बाद केले, तेव्हा त्याने स्टेन त्याच्या काळात विकेट घेतल्यानंतर ज्याप्रकारे सेलिब्रेश करायचा त्याचप्रकारे सेलिब्रेशन केले. त्याचे हे सेलिब्रेशन सध्या व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या डेल स्टेन देखील त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या वेगापुढेही अनेक मोठमोठ्या दिग्गाजांनी अनेकदा गुडघे टेकले आहेत. आता तोच स्टेन हैदराबाद संघाला गोलंदाजी प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली उमरान मलिक तयार होत असून त्यानेही त्याच्यातील प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे.
https://twitter.com/jemi_forlife/status/1519367720823037953
उमरानने शुबमन गिलला बाद केल्यानंतर हार्दिक पंड्याला देखील बाद केले, तर त्याने अर्धशतक करणाऱ्या वृद्धिमान साहाला तब्बल ताशी १५३ किमी वेगाने चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. इतकेच नाही तर त्याने पुढे त्याच्या वेगवान चेंडूने धोकादायक डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनाही बाद करत गुजरातला संकटात टाकले होते.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
राशिद आणि तेवातिया आले गुजरातच्या मदतीला
उमरानच्या गोलंदाजीमुळे हैदराबादने सामन्यात वर्चस्व निर्माण केले होते. या सामन्यात अखेरच्या षटकात गुजरातला २२ धावांची गरज होती. यावेळी हैदराबादकडून मार्को यान्सिन गोलंदाजी करत होता, तर गुजरातकडून राशिद खान आणि राहुल तेवातिया फलंदाजी करत होते.
यावेळी पहिल्या दोन चेंडूंवर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) एका षटकारासह ७ धावा काढल्या. त्यानंतर राशिद खानने (Rashid Khan) अखेरच्या ४ चेंडूत ३ षटकार खेचत गुजरातला विजय मिळवून दिला.
उमरान मलिकला सामनावीर
हा सामना गुजरातने जिंकला असला तरी उमरानने केलेल्या गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे संघ पराभूत झाल्यानंतरही सामनावीर पुरस्कार जिंकणारा उमरान आयपीएल २०२२ मधील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामात ८ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
“उमरान मलिकमधील प्रतिभा ‘दुर्लभ’; ब्रेट ली, अख्तर आणि शॉन टेटनंतर फारच कमी पाहायला मिळाला असा वेग”
अफलातून! गुजरातच्या पठ्ठ्याने गगनचुंबी षटकार मारताच आनंदाने उड्या मारू लागली हार्दिक पंड्याची पत्नी
टीम इंडियासोबत सनरायझर्सच्या ‘या’ पठ्ठ्याने गेले पाहिजे इंग्लंडला; गावसकरांनी मांडलंय मत