टी२० क्रिकेट स्पर्धेपैकी एका मोठ्या स्पर्धेचा म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा रणसंग्राम आता लवकरच सुरु होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरू होईल. हंगाम सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिल्याने खेळाडू जोमाने सराव करीत आहेत.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. या लेखात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात नोंदविलेल्या मोठ्या विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत, जे मोडणे कठिण आहे.
सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम
विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी संघ अजूनही अजिंक्यपद पटकावू शकला नाही. कोहली आणि आरसीबी संघ त्यांच्या पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न नक्कीच पाहत आहेत आणि ते यंदा पूर्ण होईल का हे पाहणे मनोरंजक असेल. पण जेव्हा आयपीएलच्या काही सर्वोत्कृष्ट विक्रमांच्या नोंदीत आरसीबीचा संघ बर्याच बाबतीत पुढे आहे. १३ वर्षाच्या आयपीएलच्या इतिहासात या संघाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
पुणे इंडिया वॉरियर्सच्या विरुद्ध २०१३ मध्ये आरसीबी संघाने सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. गेलच्या तुफानी खेळीमुळे आरसीबीने २० षटकांत २६४ धावा केल्या होत्या. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. ही धावसंख्या पार करणे एक मोठे आव्हान असेल.
सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा सीएसकेचा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगमधील एक संघ सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसला आहे, तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्स संघ. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलधील सर्वोत्कृष्ट संघ ठरला आहे. आयपीएलच्या पहिल्याच सत्रात सीएसके संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
त्यानंतर सीएसकेने २०१० मध्ये प्रथम विजेतेपद जिंकले. सीएसकेच्या संघाने आयपीएलच्या ११ हंगामात एकूण ८ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. ज्यामध्ये ३ वेळा त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई संघाचा ८ वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम लवकर मोडला जाऊ शकतो असे वाटत नाही.
विराटच्या विक्रमी धावा
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागोमाग एक विक्रम करत आहे. तसेच, आयपीएलमधेही कोहली विक्रमांना गवसणी घालत आहे. आयपीएलच्या पहिल्याच सत्रापासुन विराट कोहली आरसीबीमध्ये खेळत आहे. या संघाकडून खेळत त्याने अनेक धावा केल्या आहेत. विराट कोहलीसाठी आयपीएलचा २०१६ चा हंगाम खूपच संस्मरणीय ठरला.
या मोसमात त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने केवळ अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला नाही तर स्वत: कोहलीही यामागचे सर्वात मोठे कारण असल्याचे सिद्ध झाले. विराटने संपूर्ण हंगामात धावांचा पाऊस पाडला आणि ९७३ धावा केल्या. त्यात त्याने ४ शतकेही ठोकली होती. आयपीएलच्या एका हंगामातील या सर्वाधिक धावा आहेत. कोहलीचा हा विक्रम मोडणे फार कठीण आहे.
गेलचे तुफानी शतक
टी-२० क्रिकेटचा ‘युनिव्हर्स बॉस’ असलेल्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी केली आहे. या स्पर्धेत त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत जे मोडणे अवघड आहे. गेलच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत ६ शतके आहेत. त्यापैकी त्याने २०१३ च्या आयपीएल हंगामात अतिशय तुफानी फलंदाजी केली होती.
आयपीएलच्या त्या सत्रात ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा डाव खेळत पुणे वॉरियर्स इंडियाविरूद्ध १७५ धावा केल्या. या दरम्यान त्याने केवळ ३० चेंडूत शतक ठोकले. गेलच्या या खेळीनंतर आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने हा विक्रम गाठला नाही.