---Advertisement---

वर्ल्डकप फायनलनंतर खेळाडूंमध्ये झालेल्या भांडणाबद्दल कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला…

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 8:33 PM
---Advertisement---

काल (9 फेब्रुवारी) 13 व्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या(Under 19 World Cup) अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने भारतीय संघाचा पराभव करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच बांगलादेशने 3 विकेट्स घेत 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला.

परंतु, हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून गैरवर्तन झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी संघातील खेळाडूंच्या गैरवर्तनासाठी बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने(Akbar Ali) क्षमा मागितली आहे. तर 19 वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने(Priyam Garg) बांगलादेशच्या या वागणूकीला ‘डर्टी’ (वाईट) म्हणत टीका केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.2 षटकात सर्वबाद 177 धावा करत बांगलादेशला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 15 धावांची गरज असताना पावसाला सुरुवात झाली.

अखेर पावसामुळे सामना 46 षटकांचा करण्यात आला आणि 170 धावांचे आव्हान बांगलादेशला देण्यात आले. हे आव्हान बांगलादेशने 42.1 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

बांगलादेश संघ विजयानंतर मैदानावर जल्लोष साजरा करत असताना एका क्षणी बांगलादेशचे खेळाडू आणि भारतीय संघाचे खेळाडू यांच्यामध्ये भांडण झाल्याचे दिसले. तसेच यावेळी हे खेळाडू एकमेकांना धक्काबुक्कीही करताना दिसले. अखेर पंचांना मध्यस्थी करावी लागली. या घटनेच्या अगोदरही सामना सुरु असताना बांगलादेश आणि भारतीय खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक घडत होती.

यावेळी संघातील खेळाडूंच्या गैरवर्तनासाठी क्षमा मागत कर्णधार अली म्हणाला, “क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे. अशा खेळात आमच्या संघाचे हे वागणे लाजिरवाणे आहे. माझ्या संघाच्या वतीने मी सर्वांची माफी मागतो. इथे जे काही घडले ते घडायला नको होते.”

क्रिकइन्फोने(Cricinfo) दिलेल्या रिपोर्टनुसार, जेव्हा भारतीय कर्णधार प्रियांम गर्गला त्याच्या प्रतिक्रिया विचारल्या गेल्या. तेव्हा, त्याने बांगलादेशी खेळाडूंना स्पष्टपणे दोषी ठरवले आणि सामन्यादरम्यान विरोधी संघातील खेळाडूंच्या वर्तनाची आठवण करून दिली.

गर्ग म्हणाला, “खेळात चढ-उतार येत असतात. हार-जीत हे खेळाचे भाग आहेत. परंतु, विरोधी संघाच्या प्रतिक्रिया वाईट (डर्टी) होत्या. मला असे वाटते की, असे व्हायला नको होते. पण ठीक आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

मात्र, आयसीसी या प्रकरणावर ‘गंभीरपणे’ विचार करत आहे. सोमवारी(17 फेब्रुवारी) ते या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करतील. तसेच आयसीसी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---