येत्या नववर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज येथे आयसीसीची १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा (ICC U19 Cricket World Cup 2022) होणार आहे. १४ जानेवारी- ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) १७ सदस्यीय संहीघ घोषित केला आहे. यानंतर आता बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्रशिक्षण स्टाफचीही घोषणा केली आहे. ऋषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) हे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.
बीसीसीआयने माहिती दिली आहे की, कानिटकर हे १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. तसेच साईराज बहुतुले हे या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि मुनिष बाली हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.
भारतीय संघाच्या महागुरू कानिटकर यांच्याविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या विक्रमी कामगिरीसाठी ओळखले जाते. भारताकडून ३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या कानिटकर यांनी पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार (Winning Four Against Pakistan) मारत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.
त्याचे झाले होते असे की, त्यावेळी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे झाली होती. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सवी स्वातंत्र्य चषक (Silver Jubilee Independence Cup) नावाची एक क्रिकेट स्पर्धा आयोजण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आमि बांगलादेश संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने होते आणि या सामन्याचा निकाल बेस्ट ऑफ थ्री द्वारे लागणार होता. या सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होते.
बेस्ट ऑफ थ्रीमधील तिन्ही अंतिम सामने ढाकाच्या मैदानावर खेळवण्यात आले होते. यातील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला होता. यानंतर आता तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यावर सर्वांच्या नजरा टिकून होत्या. हा सामना ४८ षटकांचा झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाकिस्तानचा संघ उतरला होता. पाकिस्तानकडून सलामीवीर सईद अन्वर, ज्याची बॅट नेहमीच भारताविरुद्ध बोलली होती. ती या सामन्यातही तळपताना दिसली होती. अन्वरने या सामन्यात १४० धावा चोपल्या होत्या.
त्याच्याबरोबर एजाज अहमदने ११७ धावांची खेळी केली. अन्वर आणि अहमदाच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने भारताला ३१६ धावांचे आव्हान दिले होते. केवळ ४८ षटकांमध्ये हे लक्ष्य गाठणे थोडे कठीण काम होते. परंतु सौरव गांगुली आणि सचिन तेंडूलकर यांच्या जबरदस्त सलामी फलंदाजीमुळे भारतासाठी हे लक्ष्य गाठणे कठीण दिसत नव्हते. सचिनने लक्ष्याचा पाठलाग करताना ४१ धावा केल्या होत्या. तर गांगुलीने १२४ धावांचे आव्हान दिले होते.
त्यांच्या बरोबरीला रॉबिन सिंगनेही ८२ धावा चोपल्या होत्या. परंतु या आघाडीच्या ३ फलंदाजांच्या विकेट पडल्यानंतर भारताचा डाव हातून निसटायला सुरुवात झाली. शेवटी या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकापर्यंत गेला. त्यातही शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. यावेळी कानिटकर हे स्ट्राईकवर होते. त्यांनी पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारला होता आणि संघाला शेवटच्या चेंडूवर अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता.
आता याच कानिटकर यांच्या प्रशिक्षणाखाली भारताचा १९ वर्षांखालील संघ विश्वचषकात कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हते पैसे; तरीही प्रनॉयने उंचावली देशाची मान
पाकिस्तानी दिग्गजाने निवडली ‘टी२० टीम ऑफ द इयर’; चौघा भारतीयांचा समावेश