प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास योगायोग घडलेले आजपर्यंत आपण पाहात असतो. क्रिकेटमध्ये तर अनेकदा असे अनोखे योगायोग घडताना दिसतात. नुकतेच असाच एक योगायोग आजघडीचे दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांच्या बाबतीत घडलेला पाहायला मिळाला.
बुधवारी (२० ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सध्या सुरु असलेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या तयारीसाठी सराव सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता, तर विराट केवळ क्षेत्ररक्षणासाठी उतरला होता. पण, यादरम्यान विराटने अचानक गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला. त्याचमुळे तब्बल ११ वर्षांनी एक खास योगायोग घडला.
विराट-स्मिथ बाबत घडला योगायोग
विराट हा क्रिकेटमध्ये फारसा गोलंदाजी करताना दिसत नाही, तो फारच क्वचित गोलंदाजी करतो. बुधवारीही त्याने टी२० क्रिकेटमध्ये तब्बल ५ वर्षांनी गोलंदाजी केली होती. दरम्यान, तो जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात ७ व्या षटकात गोलंदाजीसाठी उतरला तेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होते. तसेच नंतर विराटने १३ व्या षटकातही गोलंदाजी केली. या षटकावेळीही स्मिथ फलंदाजी करत होता. त्यामुळे विराटच्या ६ चेंडूंचा स्मिथने सामना केला.
विशेष म्हणजे या सराव सामन्याच्या बरोबर ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २० ऑक्टोबर २०१० रोजी स्मिथने पहिल्यांदा भारताविरुद्ध वनडेत गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने विशाखापट्टणमला झालेल्या सामन्यात ३ षटके गोलंदाजी केली होती. त्यावेळी तो जेव्हा गोलंदाजी करत होता, तेव्हा भारताकडून विराट फलंदाजी करत होता. विराटने स्मिथच्या ११ चेंडूंचा सामना केला होता.
आता ११ वर्षांनी, विराटने स्मिथला गोलंदाजी केली आणि योगायोग घडला. कारण, हे दोन खेळाडू अनेकदा आमने-सामने आले आहेत; पण, त्यांनी एकमेकांविरुद्ध गोलंदाजी केलेली फारच कमी वेळा दिसले आहे. त्यातही विराटने तर फारच क्वचित गोलंदाजी केली आहे. असे असताना, २० ऑक्टोबरलाच ११ वर्षांच्या कालावधील या दोन दिग्गज फलंदाजांनी एकमेकांना गोलंदाजी करण्याचा हा खास योगायोग घडला.
स्मिथने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून केली होती. पण, नंतर त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे तोही नंतर फारसा गोलंदाजी करताना दिसला नाही.
https://twitter.com/shubham00211591/status/1450807654796849154
सध्या सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने, तर ऑस्ट्रेलिया २३ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटला गोलंदाजी करताना पाहून स्मिथही फुटले हसू, गमतीने केली गोलंदाजीची नक्कल; पाहा व्हिडिओ
बांगलादेशने नोंदवला टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विजय; पीएनजीचा पराभव करत सुपर-१२ मध्ये केला प्रवेश
भारीच! सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ला मिळतोय चांगलाच प्रतिसाद; सेहवागने ओलांडला लाखो फॉलोअर्सचा टप्पा