भारताचा माजी फलंदाज उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेत आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवतो आहे. नुकताच तो अमेरिकेतील ‘मायनर क्रिकेट लीग’ स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी कामगिरी करत चर्चेत आला होता. यानंतर आता याच उन्मुक्त चंदने ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध टी२० लीग अर्थात बिग बॅश लीग (बीबीएल) स्पर्धेत खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याने बीबीएलमधील मेलबर्न रेनेगेड्स संघासोबत करार केला आहे. यासह उन्मुक्त चंद हा बीबीएलमध्ये खेळणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू बनणार आहे.
भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद याने १३ ऑगस्ट रोजी भारतातील क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. अमेरिकेत आपली पुढील क्रिकेट कारकिर्द घडवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला होता. यानंतर आता तो बीबीएल स्पर्धेत खेळताना दिसून येईल.
याविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी मेलबर्न रेनेगेड्स कुटुंबाचा भाग बनून खूप आनंदीत आहे. रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी बीबीएल स्पर्धा पाहात आलो आहे आणि आता याच स्पर्धेत खेळण्याची संधी दवडून आली आहे. त्यामुळे मी उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.”
२८ वर्षीय उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. दिल्लीमध्ये जन्मलेला उन्मुक्त चंद भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळत होता. त्यानंतर त्याने उत्तराखंड संघाकडून खेळताना कर्णधारपद देखील भूषवले होते. तसेच भारत अ संघाकडून देखील त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. चंदने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण ६७ प्रथम श्रेणीचे सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने ३३७९ धावा केल्या होत्या, ज्यात ८ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित अन् राहुलचा अर्धशतकी धमाका! चौदा वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाची केलीय बरोबरी
रोहितचा झंझावात! अफगाणिस्तानविरुद्ध ७४ धावांच्या खेळीसह जयवर्धनेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
रोहित-राहुल जोडीची कमाल! तब्बल १४० धावांच्या भागीदारीसह मोठा विक्रम केला नावावर