पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत अर्बन रेवन्स संघाने ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाचा 4-0 असा सहज पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत अर्बन रेवन्स संघाने ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाचा 4-0 असा धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. सामन्यात गोल्ड खुल्या दुहेरी गटात अर्बन रेवन्सच्या अनिकेत शिंदे व केदार नाडगोंडे यांनी ब्लेझिंग ग्रिफिन्सच्या जयदीप गोखले व कुणाल पाटील यांचा 16-21, 21-11, 21-14 असा तर, सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात अजिंक्य मुठे व आनंद शहा यांनी ब्लेझिंग ग्रिफिन्सच्या हर्षवर्धन आपटे व विनीत रुकारी यांचा 21-18, 21-18 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.
गोल्ड खुल्या मिश्र दुहेरी गटात अर्बन रेवन्सच्या संग्राम पाटीलने सारा नवरेच्या साथीत ब्लेझिंग ग्रिफिन्सच्या सुधांशु मेडसीकर व दिपा खरे या जोडीचा 15-21, 21-16, 21-19 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. वाईजमन गटात अर्बन रेवन्सच्या श्रीदत्त शानबाग व विवेक जोशी या जोडीने गिरीश करंबेळकर व प्रशांत वैद्य यांचा 21-08, 21-18 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्या अर्बन रेवन्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि ट्रूस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, पीडीएमबीएचे उपाध्यक्ष गिरीश नातू, सारंग लागू, विनायक द्रविड, तुषार नगरकर, स्पर्धा संचालक विवेक सराफ, अभिषेक ताम्हाणे, गिरीश करंबेळकर, रणजित पांडे आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर देवेंद्र चितळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
अर्बन रेवन्स वि.वि. ब्लेझिंग ग्रिफिन्स 4-0
(गोल्ड खुला दुहेरी गट: अनिकेत शिंदे/केदार नाडगोंडे वि.वि.जयदीप गोखले/कुणाल पाटील 16-21, 21-11, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी गट: अजिंक्य मुठे/आनंद शहा वि.वि.हर्षवर्धन आपटे/विनीत रुकारी 21-18, 21-18; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: संग्राम पाटील/सारा नवरे वि.वि.सुधांशु मेडसीकर/दिपा खरे 15-21, 21-16, 21-19; वाईजमन: श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि.गिरीश करंबेळकर/प्रशांत वैद्य 21-08, 21-18).
इतर पारितोषिके:
अंतिम सामन्याचा मानकरी: केदार नाडगोंडे;
गोल्ड खुला दुहेरी: आर्य देवधर(पुरुष), वृषी फुरीया(महिला);
सिल्व्हर खुला दुहेरी: आशय कश्यप(पुरुष), अनया तुळपुळे(महिला);
सर्वोत्कृष्ट वाईजमन: श्रीदत्त शानबाग व विवेक जोशी;
सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू: प्रथम वाणी(पुरुष), शताक्षी किनीकर(महिला);
कॅप्टन चॉईस अवॉर्ड: गिरीश मुजुमदार(पुरुष), सारा नवरे(महिला);
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट: संग्राम पाटील(पुरुष), सारा नवरे(महिला).