ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या ऍशेस मालिके (Ashes Series) तील दुसरा सामना (2nd Test) नुकताच ऍडलेड येथे पार पडला. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमानांनी २७५ धावांनी बाजी मारली आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडवर दबाव बनवायला सुरुवात केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू चिंतामुक्त होऊन या सामन्याचा आनंद लुटताना दिसून आले. त्यातही उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने भर मैदानात डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ऍडलेड कसोटीच्या चौथ्या दिवशी हा प्रकार घडला. या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ख्वाजाला जागा मिळाली नव्हती. परंतु सामन्यादरम्यान त्याला सब्टिट्यूट क्षेत्ररक्षक (Substitute Fielder) म्हणून मैदानात बोलावण्यात आले होते. तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंड संघाला समर्थन करण्यासाठी आलेल्या बार्मी आर्मीच्या धूनवर डान्स करण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही. त्याने त्यांच्या धूनवर ठेका धरला आणि सर्वांपुढे मूनवॉक स्टाईल डान्स (Moonwalk) केला.
ख्वाजाला नाचताना पाहून दर्शक इतके आनंदी झाले की, त्यांनी टाळ्या वाजवून त्याच्या डान्सची प्रशंसा केली. याबरोबरच काहींनी उठून गोल फिरत ख्वाजासोबत डान्सही केला. सामना समालोचकही त्याच्या डान्सला पाहून भरपूर खुष झाल्याचे दिसून आले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या या डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला असून, हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरताना दिसतो आहे.
Usman Khawaja pulling out the shuffle for the Barmy Army! ???????? #Ashes pic.twitter.com/RD9b4Ws4ce
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2021
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियापुढे पाहुण्या इंग्लंडने पुन्हा एकदा नांगी टाकली. जेम्स अंडरसन, स्टुअर्ट ब्रॉड असे एकाहून एक सरस इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कमी धावसंख्येवर अडवू शकले नाहीत. मार्नस लॅब्यूशेनचे शतक, डेविड वॉर्नरच्या ९५ धावा आणि स्टिव्ह स्मिथची ९३ धावांची कर्णधार खेळी ऑस्ट्रेलियासाठी फायद्याची गोष्ट ठरली. त्यांनी पहिल्या डावातच इंग्लंडपुढे ४७३ धावांचे मोठे आव्हान ठेवले.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २३६ धावाच करू शकला. इंग्लंडकडून डेविड मलानने ८० व कर्णधार जो रूटने ६० धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत. मार्नस लॅब्यूशेन आणि ट्रॅविस हेड यांना वगळता कोणीही अर्धशतक करू शकले नाही. परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांनी इंग्लंडला ४६७ धावांचे भलेमोठे आव्हान दिले, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९२ धावावरच गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-






