दुबई। पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया संघात पार पडलेला पहिल्या कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलिया समोर विजयासाठी 462 धावांचे आव्हान होते.
पण 8 विकेट गेल्यानंतरही अखेर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने चांगली लढत देत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाला देण्यात आला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक केले आहे.
या सामन्यात आज(11 आॅक्टोबर) पाचव्या दिवशी आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 3 बाद 136 धावांपासून खेळायला सुरुवात केली. यावेळी उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड नाबाद खेळत होते. या दोघांनीही पाचव्या दिवशीही चांगला खेळ केला.
त्यांनी पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाला 200 धावांचाही टप्पा पार करुन दिला. मात्र त्यानंतर हेडला 72 धावांवर असताना मोहम्मद हाफिजने बाद करत हेड आणि ख्वाजाची जोडी तोडली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 132 धावांची शतकी खेळी केली.
त्यानंतर काही वेळात मार्नस लेबसचगनेही 13 धावांवर असताना विकेट गमावली. परंतू त्यानंतरही ख्वाजा आणि पेनने चांगली फलंदाजी करताना सहाव्या विकेटसाठी 79 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. पण ख्वाजा शतक करुन बाद झाल्याने ही जोडी तुटली.
ख्वाजाने 302 चेंडूत 141 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार मारले. मात्र त्यानंतर लगेचच मिचेल मार्श आणि पिटर सिडलेने लगेचच विकेट गमावली. पण यानंतर नॅथन लिओनने कर्णधार पेनला चांगली साथ दिली. त्याने 34 चेंडूत नाबाद 5 धावा केल्या. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 8 बाद 362 धावा केल्या.
पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात यासीर शहाने 114 धावांत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद अब्बास(3/56) आणि मोहम्मद हाफिजने (1/29) विकेट घेतल्य़ा.
तत्पुर्वी पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 482 धावा केल्या होत्या. या डावात मोहम्मद हाफिज(126) आणि हारीस सोहीलने(110) शतक केले होते.
तसेच आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ख्वाजा(85) आणि अॅरॉन फिंचने(62) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 202 धावा केल्या. या डावात पाकिस्तानच्या बिलाल असीफने 6 आणि मोहम्मद अब्बासने 4 विकेट घेतल्या.
त्यामुळे पाकिस्तानने 280 धावांची भक्कम आघाडी मिळवली. पाकिस्तानने दुसरा डाव 6 बाद 181 धावांवर चौथ्या दिवशी घोषित केला. यामुळे त्यांनी 462 धावांचे आव्हान आॅस्ट्रेलियापुढे ठवले.
संक्षिप्त धावफलक-
पाकिस्तान पहिला डाव – सर्वबाद 482 धावा
आॅस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 202 धावा
पाकिस्तान दुसरा डाव – 6 बाद 181 धावा (घोषित)
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव – 8 बाद 362 धावा
सामनावीर – उस्मान ख्वाजा (पहिला डाव – 85 धावा, दुसरा डाव – 141 धावा)
महत्वाच्या बातम्या-
- पृथ्वी शाॅच्या अडचणी वाढल्या, विंडीजच्या गोलंदाजाने शोधली बाद करण्याची सुपर आयडीया
- वन-डेत रिषभ पंतची निवड एमएस धोनीसाठी धोक्याची घंटा
- #MeToo Movement: अर्जुना रणतुंगापाठोपाठ लसिथ मलिंगावरही झाले आरोप