आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल पाहायला मिळाला. संघानं पाच वेळचा विजेता कर्णधार रोहित शर्माकडून कर्णधारपद हिसकावून घेत संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. मात्र या निर्णयामुळे चाहते खूप निराश झाले आहेत. चाहत्यांची ही नाराजी मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांमध्ये दिसून आली. हार्दिकला मैदानावर चाहत्यांच्या भरपूर रोषाचा सामना करावा लागला.
मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला अजूनही कर्णधार म्हणून स्वीकारलेलं नाही. त्याच्या नेतृत्वावर अनेक दिग्गज टीका करत आहेत, तर काही जणांनी त्याला पाठिंबाही दिला आहे. अलीकडेच भारताचा माजी यष्टीरक्षक रॉबिन उथप्पानंही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. रॉबिन उथप्पानं हार्दिक पांड्याची बाजू घेतली आहे.
भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पानं एका पॉडकास्टमध्ये म्हटलं की, “हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सनं शोधलं आहे. जेव्हा रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद देण्यात आलं होतं, तेव्हा त्या हंगामाच्या मध्यात रिकी पाँटिंगकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आलं होतं.”
उथप्पा पुढे म्हणाला की, “मी रोहित शर्माच्या क्षमतेवर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. परंतु फ्रँचायझीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, गेल्या काही वर्षांपासून कर्णधार म्हणून त्याची आकडेवारी चांगली नव्हती. त्यानं 2020 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकवून दिली. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तो मुंबईला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. शिवाय गेल्या तीन वर्षांत रोहितनं 300 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. म्हणजेच फलंदाज म्हणूनही त्याला यश मिळालेलं नाही. त्यानं फक्त आयपीएल सोडून इतर सर्वत्र धावा केल्या आहेत.”
आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपत आहे. त्यानं या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 297 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. नाबाद 105 ही त्याची चालू हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नटराजनची घातक गोलंदाजी, हैदराबादनं नोंदवला सलग चौथा विजय; घरच्या मैदानावर दिल्लीचा लाजिरवाणा पराभव