साथियन याचा UTT सीझन 4 मध्ये 23 व्या क्रमांकावरील ओमारकडून पराभव
पुणे, २१ जुलै २०२३ : भारताचा स्टार खेळाडू साथियन ज्ञानसेकरन याला इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ मध्ये शुक्रवारी जागतिक क्रमवारीत २३व्या क्रमांकावरील ओमार असारकडून पराभव पत्करावा लागला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ सुरू आहे आणि आजचा सामना चुरशीचा झाला. दबंग दिल्ली टीटीसीकडून खेळणाऱ्या साथियनने पहिला गेम जिंकला, परंतु आयटीटीएफ आफ्रिकन चषक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूकडून १-२ अशी हार मानावी लागली.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशन (TTFI) च्या मान्यतेखाली नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी फ्रँचायझी-आधारित लीगला प्रोत्साहन दिले आहे. २०१७ पासून सुरू झालेली लीग भारतातील टेबल टेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे.
साथियनने मागील सामन्यात जागतिक क्रमवारीत ५८व्या क्रमांकावरील किरिल गेरासिमेन्कोचा पराभव केला होता आणि त्याने आजच्या लढतीत सकारात्मक सुरुवात केली. त्याने परतीचे सुरेख फटके मारून प्रतिस्पर्धी ओमारला थक्क केले आणि पहिला गेम ११-६ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय खेळाडूने सर्व अनुभव पणाला लावताना ओमारला कडवी टक्कर दिली. ओमारला गेम जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यास साथियनने भाग पाडले. फोरहँड आणि बॅकहँडचा सुरेख खेळ या दोघांमध्ये पाहायला मिळाला. पण, ओमारने हा गेम ११-८ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये त्याने साथियनला संधीच दिली नाही आणि हाही गेम ११-४ असा जिंकला.
त्यानंतर, दबंग दिल्ली टीटीसीच्या बार्बोरा बालाझोव्हाने २-१ अशा फरकाने पुणेरी पलटन टेबल टेनिस संघाच्या हाना माटेलोव्हाचा पराभव केला. पहिल्या गेममध्ये स्लोव्हाकियन खेळाडूला हानाच्या आक्रमकतेसमोर टीकता आले नाही आणि हानाने हा गेम ११-२ असा जिंकला. पण, बार्बोराने पुढील दोन गेममध्ये पुनरागमन करत बाजी मारली.