भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर खेळवला गेला. मात्र मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमान भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचे फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताला पहिल्या डावात अवघ्या १२४ धावा करता आल्या, आणि इंग्लंडने हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली देखील अपयशी ठरला. ज्यावरून उत्तराखंड पोलिसांनी कोहलीला ट्रोल केले आहे.
उत्तराखंड पोलिसांचे मजेदार ट्विट
भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात भोपळाही न फोडता बाद झाला. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात कोहली मिड ऑफवरील क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल घेऊन माघारी परतला. मात्र तो शून्यावर बाद झाला हे पाहून उत्तराखंड पोलिसांनी मजेशीर ट्विट केले.
या ट्विट मध्ये कोहलीचा शून्यावर बाद होतानाचा फोटो टाकत त्यांनी म्हंटले, “हेल्मेट घालणेच केवळ पुरेसे नसते. पूर्ण खबरदारी घेऊन गाडी चालवणे आवश्यक आहे. नाहीतर कोहली सारखे तुम्हीही शून्यावर बाद होऊ शकता.”
https://twitter.com/uttarakhandcops/status/1370385462846582784
दरम्यान, कोहलीच्या आणि इतरही फलंदाजांच्या अपयशाचा भारतीय संघाला चांगलाच फटका बसला. श्रेयस अय्यरच्या ६७ धावांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताला निर्धारित २० षटकांत केवळ १२४ धावा करता आल्या.
इंग्लंडने हे सोप्पे लक्ष्य १५.३ षटकांतच गाठले. सलामीवीर जेसन रॉयने ४९ धावांची खेळी केली. पहिल्या डावात ३ बळी घेणार्या जोफ्रा आर्चरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
आदिल रशीदला मोठा फटका मारण्याच्या नादात कोहली भोपळाही न फोडता माघारी, पाहा व्हिडिओ