आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१७ मे) संध्याकाळचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुन्हा एकदा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीची बॅट चालली आणि त्याने या स्पर्धेच्या इतिहासात आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली. तो आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
वैभवने डीसीविरुद्ध जबरदस्त सुरूवात केली. त्याने लुंगी एन्गिडीचा सामना करताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. या सामन्यात त्याने २१ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकार मारत ४६ धावा केल्या. त्याने केवळ १२ डावांमध्ये आपल्या षटकारांची संख्या ४३ वर नेली. हा टप्पा गाठताना त्याने अभिषेक शर्मा (२०२४ मध्ये ४२), श्रेयस अय्यर (२०२५ मध्ये ३९), विराट कोहली (२०१६ मध्ये ३८) आणि सूर्यकुमार यादव (२०२५ मध्ये ३८) यांना मागे टाकले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने सलग दुसऱ्या हंगामातही चौकार-षटकारांचा पाऊस पाडत धावा करण्यात सातत्य राखले आहे. त्याने आपल्या निर्भीड वृत्तीने आणि धमाकेदार फलंदाजीने राजस्थान रॉयल्सच्या डावाची चांगली सुरूवात करून दिली आहे. त्यामुळे त्याची तुलना या लीगमधील काही सर्वात विध्वंसक फलंदाजांशी केली जात आहे.
वैभव आता आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानी आला आहे. या यादीत दिग्गज क्रिस गेल ५९ षटकारांसह पहिल्या स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ही कामगिरी केली होती.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय-
४३ – वैभव सूर्यवंशी (२०२६)
४२ – अभिषेक शर्मा (२०२४)
३९ – श्रेयस अय्यर (२०२५)
३८ – विराट कोहली (२०१६, २०२४)
३८ – सूर्यकुमार यादव (२०२५)
आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
५९ – क्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१२)
५२ – आंद्रे रसेल (कोलकाता नाइट राइडर्स, २०१९)
५१ – क्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१३)
४५ – जोस बटलर (राजस्थान रॉयल्स, २०२२)
४४ – क्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०११)
४३ – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स, २०२६)
तसेच वैभवने आयपीएलच्या या हंगामात पाचव्यांदा आपल्या डावाची सुरूवात षटकाराने केली. या स्पर्धेत एकूण आठव्यांदा असे घडले आहे. एकाच आयपीएल हंगामात तीन वेळा आपल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या एलिट यादीतही त्याने स्थान मिळवले आहे.
आयपीएलच्या एका हंगामात पहिल्याच चेंडूवर तीन वेळा षटकार मारणारे खेळाडू –
शाहरुख खान (पंजाब किंग्ज) – २०२३
सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स) – २०२५
देवदत्त पडीक्कल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – २०२६
वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) – २०२६






