दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (१९ जानेवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली आहे. या मलिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे झाला. हा सामना भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरसाठी खास ठरला आहे. कारण, या सामन्यातून त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो वनडेत पदार्पण करणारा भारताचा २४२ वा खेळाडू ठरला. त्याने २०२१ आयपीएल हंगामात दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. इतकेच नाही, तर त्याने भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवत भारतीय संघाचे दार त्याच्यासाठी उघडायला भाग पाडले. असे असले तरी याच व्यंकटेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
आईच्या हट्टामुळे बनला क्रिकेटपटू
व्यंकटेश क्रिकेटपटू होण्यामागे त्याच्या आईचा सर्वात मोठा हात आहे. खरंतर व्यंकटेश हा लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होता. तो सतत अभ्यास करत असल्याने त्याच्या आईला वाटायचे की तो घरात राहून आजारी पडेल. त्यामुळे आईने त्याला मित्रांसोबत क्रिकेट खेळायला पाठवण्यास सुरुवात केली. येथूनच त्याच्या क्रिकेटचा श्रीगणेशा झाला.
सीए सोडून बनला क्रिकेटपटू
व्यंकटेश वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. त्याने पदवी अव्वल राहूनच पूर्ण केली. त्यानंतर त्याने चार्टर्ड अकाउंटंटची (सीए) पात्रता परीक्षा देखील उत्तीर्ण केली. मात्र, अखेरीस क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी त्याने सीए न होण्याचा निर्णय मागे घेतला. त्याने फायनान्स विषयात एमबीए करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत तो मध्य प्रदेशच्या तेवीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधारही बनला होता.
व्यंकटेशने एका मुलाखतीत म्हटले आहे की, “मी क्रिकेटपटू नसतो तर कदाचित आयआयटी व आयआयएमचा भाग असतो.” याखेरीज व्यंकटेश उत्तम स्वयंपाक देखील बनवतो. तसेच, तो रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे.
देशांतर्गत कारकीर्द
सध्या २६ वर्षात असलेला व्यंकटेश २०१५ पासून मध्यप्रदेशसाठी क्रिकेट खेळत आहे. २०२०-२०२१ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी अत्यंत धडाकेबाज होती. स्पर्धेत ७५.६६ च्या लाजवाब सरासरीने व १४९.३४ च्या उच्च स्ट्राईक रेटने २२७ धावा काढल्या होत्या. याच वर्षी पंजाब विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीत त्याने १९८ धावांची खेळी केली होती. तसेच २०२१-२२ विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्याने ६ सामन्यात ३७९ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याने आत्तापर्यंत १० प्रथम श्रेणी सामने खेळले असून ५४५ धावा केल्या आहेत आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ३० अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये १२२८ धावा केल्या असून १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीत ५६ टी२० क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने या टी२० सामन्यांमध्ये १२८५ धावा केल्या असून ३० विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
पहिल्या वनडेसाठी असे आहेत भारत-दक्षिण आफ्रिकेचे ११ जणांचे संघ; वेंकटेश अय्यरचे झाले पदार्पण