भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक झालेले संजय मांजरेकर आज (12 जुलै) 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मांजरेकर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 111 सामने खेळले आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी बाबतीत मांजरेकरांना एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणले जाते. याच कारणास्तव त्यांची तुलना एकेकाळी महान फलंदाज सुनील गावसकरांशी केली जात होती. मांजरेकर यांच्याकडे दिवसभर फलंदाजी करण्याची क्षमता होती आणि याची चुणूक त्यांनी 1992-93 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध 104 धावा उत्कृष्ट खेळी करत दाखवली होती.
संजय मांजरेकर यांनी 1987 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मांजरेकर यांनी कसोटी कारकिर्दीत चार शतके केली ज्यामधले एक शतक हरारेमध्ये 9 तास खेळी करत केले होते. 1992 मध्ये 18 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने पहिल्या डावात 456 धावा केल्या.
या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अझरुद्दीन करत होता. भारतीय संघाने या डावाची सुरुवात चांगली केली नव्हती. रवि शास्त्री (11), सचिन तेंडुलकर (0), अजहरुद्दीन (9), वेंकटपति राजू (7) हे उत्कृष्ट फलंदाजी करणारे खेळाडू लवकरच तंबूत परतले होते. भारतीय संघाचे 101 धावांवर 5 गडी बाद झाले होते. परंतु, मांजरेकरांनी तब्बल 9 तास फलंदाजी करत संघाला 307 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मांजरेकर यांनी 422 चेंडू खेळत 7 चौकार लगावले.
या सामन्यात अखेरच्या दिवसाखेर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 4 बाद 146 धावा केल्या असल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
संजय मांजरेकर यांचा जन्म म्हैसूरमध्ये झाला असून त्यांचे वडील विजय मांजरेकर हे देखील भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 55 कसोटी सामने खेळले होते. संजय मांजरेकर यांनी क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर समालोचक म्हणूनही नाव कमावले. त्यांनी आतापर्यंत अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचन करताना आपल्या आवाजाने आणि शैलीने सर्वांवर जादू केली आहे.
मांजरेकर यांची कारकीर्द
भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू संजय मांजरेकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 37 कसोटी आणि 74 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मांजरेकर यांनी कसोटीमध्ये 37.14 च्या सरासरीने एकूण 2043 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावले आहे. तर एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 1 शतक आणि 15 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 1994 धावा केल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांनी 147 प्रथम श्रेणी सामन्यात एकूण 10252 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 32 शतकं आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही ‘या’ क्रिकेटपटूंनी टाकला नाही एकही चेंडू