पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना बुधवारी (३० डिसेंबर) संपला. बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने १०१ धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावातील आघाडी आणि दुसऱ्या डावाची धावसंख्या मिळून न्यूझीलंडने पाकिस्तानला दुसऱ्या डावात ३७३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण पाकिस्तान संघ २७१ धावांवरच गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने १०१ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यातील न्यूझीलंड संघाच्या क्षेत्ररक्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अशी लढवली केन विलियम्सनने शक्कल
या सामन्यातील दुसऱ्या डावात ११५.४ षटकापर्यंत पाकिस्तान संघ ९ बाद २६१ धावांवर होता. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह आणि शाहिन आफ्रिदी धिम्या गतीने फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेत होते. डावातील १२२ व्या षटकापर्यंत त्यांनी मिळून १० धावाही काढल्या. त्यामुळे पटकन एक विकेट मिळवत मोठ्या फरकाने सामना खिशात घालण्याच्या अनुषंगाने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने शक्कल लढवली.
त्याने पुढील षटक फिरकीपटू मिचेल सेंटनरच्या हाती सोपवले. त्याबरोबरच क्रिजच्या अगदी जवळ एका बाजूला ४ खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला ३ खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी उभे केले. जेणेकरुन फलंदाजावर दबाव निर्माण होईल. तसेच लवकर त्याची विकेटही मिळेल. विशेष म्हणजे, विलियम्सनचा या तोडग्याने षटकातील तिसऱ्याच चेंडूवर संघाला दहावी विकेट मिळवून दिली. गोलंदाजी करत असलेल्या मिचेल सेंटनरनेच फलंदाज नसीम शाहचा झेल पकडत संघाला सामना जिंकून दिला.
या क्षेत्ररक्षणावेळीचाच व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका क्रिकेट रसिकाने ‘लाँग लिव्ह टेस्ट क्रिकेट (Long Live Test Cricket)’ असे लिहत हा व्हिडिओ शेअर केला आहे. थोडक्यात त्याने न्यूझीलंड संघाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाची प्रशंसा केली आहे.
Long live Test cricket ❤️ pic.twitter.com/VCgrRxRMrX
— Mazher Arshad (@MazherArshad) December 30, 2020
दुसऱ्या कसोटी सामन्याने दौऱ्याचा शेवट
न्यूझीलंड-पाकिस्तान संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना नविन वर्षात खेळला जाईल. ३ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत क्राइस्टचर्च येथे होणाऱ्या या सामन्याने कसोटी मालिका आणि दौरा समाप्त होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे
नवा गोलंदाज आल्यास चेंडू करावा लागणार सॅनिटाईज, वाचा देशांतर्गत क्रिकेटचे नवे नियम
‘हा’ खेळाडू पुढील दहा वर्षे भारतीय संघाकडून खेळेल, मायकेल हसी यांनी वर्तविले भाकीत