ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. शुक्रवारपासून (१५ जानेवारी) सुरु झालेल्या या निर्णायक सामन्याचा आज (१६ जानेवारी) दुसरा दिवस चालू आहे. या दिवशी ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. परंतु भारतीय गोलंदाजांपुढे जास्त वेळ त्यांची फलंदाजी टिकू शकली नाही आणि ऑस्ट्रेलिया संघ ३६९ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने कॅमरॉन ग्रीनची दांडी उडवत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
झाले असे की, डावातील १०० व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलिया संघ ६ बाद ३११ धावांवर होता. त्यानंतर पदार्पणवीर वॉशिंग्टन पुढील षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील पहिल्या चार चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी २ धावा घेतल्या. मात्र त्याच्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलिया विस्फोटक फलंदाज ग्रीनची दांडी उडाली. ग्रीनने त्या चेंडूला हीट करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटला लागला नाही आणि सरळ मागे यष्टीला जाऊन लागला. अशाप्रकारे ग्रीन १०७ चेंडूत ४ चौकार मारत ४७ धावांवर त्रिफळाचीत झाला.
क्रिकेट.कॉम.एयूने वॉशिंग्टनच्या शानदार विकेटचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्याची प्रशंसा केली आहे.
Oh my goodness! Did that one go the other way? @hcltech | #AUSvIND pic.twitter.com/H8khO6TjK3
— cricket.com.au (@cricketcomau) January 16, 2021
मार्नस लॅब्यूशानेचे शानदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांना संघाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅब्यूशानेने बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकले. २०४ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०८ धावा केल्या. याबरोबरच कर्णधार टीम पेनने अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाजांना ५० धावांचा आकडाही गाठता आला नाही.
प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर २ विकेट गमावत ६२ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे(२) आणि चेतेश्वर पुजारा(८) फलंदाजी करत आहेत. तर शुभमन गिल(७) आणि रोहित शर्मा(४४) ही सलामीवीरांची जोडी बाद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Test Live : शेपूट वळवळलं; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात
AUS v IND : कसोटी मालिकेत चारही सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचा होऊ शकतो ‘असा’ ११ जणांचा संघ
ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज