सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पीएसएलच्या (PSL 2022) पहिल्या क्वालिफायर सामन्यात गद्दाफी स्टेडियममध्ये मुलतान सुलतान्सने चमकदार कामगिरी करत लाहोर कलंदर्सचा २८ धावांनी पराभव करत पीएसएल फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात २३ वर्षीय पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) मुलतान सुलतान्सच्या विजयाचा हिरो ठरला आहे. या सामन्यात विरोधी संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीची विकेट घेतल्यानंतर दहानी खूपच उत्साही दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा प्रकार लाहोर कलंदर्स संघाच्या १८ व्या षटकात घडला. षटकाच्या ४ थ्या चेंडूवर शाहनवाझ दहानीने आफ्रिदीची विकेट घेतली आणि त्याने जल्लोषात सीमारेषेकडे धाव घेऊन बोटाने काही हातवारेही केले. यानंतर काही चाहत्यांना त्याचा हा अंदाज आवडला, तर काही चाहत्यांनी त्याला ट्रोल देखील केले आहे.
RUN ALL YOU WANT! @ShahnawazDahani is lethal tonight 🔥 #HBLPSL7 l #LevelHai l #LQvMS pic.twitter.com/ZV1z3unRwU
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 23, 2022
या सामन्यात दहानीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दहानीचे हे सेलिब्रेशन शाहिद आफ्रिदीशी जोडले जात आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आफ्रिदीने एका कार्यक्रमात सांगितले होते की, “तो दहानीच्या कामगिरीवर खुश नाही. नसीम शाह आणि दहानी असे गोलंदाज असू शकतात, जे पाकिस्तानचे भविष्य आहेत. मात्र, दहानीचा इकॉनॉमी रेट अजिबात चांगला नाही. दहानीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.”
क्वालिफायर सामन्यात दहानीने चार षटकात फक्त १९ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. सध्याच्या पीएसएलमध्ये दहानीची कामगिरी खूप चांगली आहे. त्याने या काळात १० सामने खेळले आहेत आणि १६ विकेट्स घेतल्या आहेत. विकेट घेण्याच्या बाबतीत तो शाहीन आफ्रिदीपेक्षाही पुढे आहे.
आफ्रिदीने आतापर्यंत ११ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत, तर नसीम शाहने १० सामन्यांत १४ बळी घेतले आहेत. दहानीचे सेलिब्रेशन पाहून असे वाटले की त्याला शाहिद आफ्रिदीला दाखवून द्यायचे होते की त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरदार’ बनलेल्या कोहलीला पाहून चाहते क्रेझी, अनुष्काही नव्या लूकमध्ये कॅमेरात कैद; काय आहे प्रकरण?
…तर महिला विश्वचषकात ९ खेळाडूंसह देखील खेळवला जाणार सामना, आयसीसीने केला मोठा बदल
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’