मागील महिन्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मोठ्या उत्साहात सुरु झाला होता. मात्र या हंगामाचा दुसरा टप्पा सुरु होताच भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका स्पर्धेला बसला. त्यामुळे अखेर ४ मे रोजी २९ सामन्यांनंतर हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. पण असे असले तरी सध्या सोशल मीडियावर आयपीएलमधील संघ विविध व्हिडिओ, फोटो पोस्ट करुन चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच सनरायझर्स हैदराबाद संघानेही असा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
सनरायझर्सने शेअर केला खेळाडूंचा जुना व्हिडिओ
बुधवारी(१२ मे) सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघातील क्रिकेटपटूंचा बास्केटबॉल खेळतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जेसन होल्डर असे काही खेळाडू बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. भारतात जरी बास्केटबॉल जास्त लोकप्रिय खेळ नसला तरी अन्य अनेक देशात हा लोकप्रिय खेळ आहे.
हैदराबादने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की वॉर्नर, विलियम्सन, होल्डर हे खेळाडू कुशलतेने बास्केटबॉल खेळत आहेत. तसेच ते एक एक करुन बास्केटमध्ये अचूक बॉल टाकत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांकडून पंसती मिळत असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हैदराबादने ‘नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनला’ (एनबीए) ला देखील टॅग केले आहे. तसेच त्यांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे, असे विचारले आहे.
Hey, @NBA 👋
What say? 😉#OrangeOrNothing #OrangeArmy pic.twitter.com/qNQaoSZgzm
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 11, 2021
परदेशी खेळाडू मायदेशी रवाना
आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित झाल्याने काही परदेशी खेळाडू आपल्या मायदेशी रवाना झाले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे काही खेळाडू त्यांच्या देशातील प्रवासाच्या निर्बंधामुळे मालदीवला गेले आहेत. तेथून ते मायदेशी जातील. केवळ केन विलियम्सन, मिशेल सँटेनर आणि काईल जेमिसन हे न्यूझीलंडचे खेळाडू मालदीवमधून इंग्लंडला जातील. त्यांना इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळायची आहे.
हैदराबादची खराब कामगिरी
हैदराबादची यंदाच्या हंगामात खूपच खराब कामगिरी झाली. त्यातच ६ सामन्यांनंतर त्यांना डेव्हिड वॉर्नरला संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकत नेतृत्त्वपदाचा मुकुट केन विलियम्सनच्या डोक्यावर चढवला.
आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ६ सामने खेळले. त्यातील केवळ १ सामना जिंकण्यात संघाला यश आले. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्यानंतर विलियम्सनने नेतृत्व केलेल्या एका सामन्यात देखील हैदराबादला पराभवाचाच सामना करावा लागला. यानंतर त्यांना आयपीएल स्थगित झाल्याने पुढील सामने खेळताना आले नाहीत. आयपीएल २०२१ हंगाम स्थगित झाला तेव्हा हैदराबाद केवळ १ विजयासह गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही ‘या’ कारणामुळे मुकणार उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाला?
विराट-अनुष्काच्या मोहिमेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद; पाच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा कोरोना मदतनिधी
विराट कोहली ‘या’ बाबतीत नेहमीच हरतो, शुबमन गिलने केला खुलासा