आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (१०) रायपूरच्या मैदानावर चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळाल. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला २ विकेट्सने पराभूत केले. यावेळी विजयानंतरचे आरसीबीच्या टिम डेव्हिडने केलेले सेलिब्रेशन चर्चेत आले आहे. शेवटच्या चेंडूवर आरसीबीला जिंकण्यासाठी २ धावांची आवश्यकता असताना त्यांच्या डगआऊटमध्ये शांतता होती. रसिक सलीम दारने त्या दोन धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
विजयानंतर विराट कोहली आणि इतर खेळाडू जल्लोष करत मैदानाकडे धावले. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते डेव्हिडच्या हावभावाने, स्पर्धेतून बाहेर पडलेल्या एमआय विरुद्धच्या विजयाचा आनंद साजरा करताना त्याने मधले बोट दाखवले.
हा सामना जिंकल्याने गतविजेत्याने गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले असून ४ सामने गमावले आहेत. त्यांचा नेट रनरेटही १.१०३ असा उत्तम आहे. दुसरीकडे एमआय प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्यांनी ११ पैकी ८ सामने गमावले आहेत.
डेव्हिडसाठी हा हंगाम हवा तसा चांगला जात नाहीये. तो धावा करण्यात अपयशी ठरत आहे. एमआय विरुद्धही असेच झाले. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आता त्याच्या या सेलिब्रेशनने त्याला अडचणीत आणले आहे. चाहत्यांनी त्याच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला बीसीसीआयने शिक्षा सुनावली असून त्याला त्याच्या सामना शुल्काच्या ३०% दंडासह २ डिमेरीट पॉइंट्सही दिले आहेत.
तसेच आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांनाही सामन्यावेळी चौथ्या पंचांशी वाद घातल्याने शिक्षा केली आहे. त्यांना सामना शुल्काच्या १५ % दंड ठोठावला आहे.
या सामन्यात एमआय सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळत होता. त्यांनी नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. तिलक वर्माच्या ५७ धावा आणि नमन धीरच्या ४७ धावांच्या जोरावर त्यांनी २० षटकांत ७ विकेट्स गमावत १६६ धावा केल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४ षटकांत २३ धावा देत रोहित शर्मा (२२), रायन रिकल्टन (२), तिलक आणि सूर्यकुमार यादव (०) यांना बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून कृणाल पांड्याने प्रभावी फलंदाजी केली. त्याने ७३ (४६) धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबी जिंकला आणि एमआय प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाले.






