देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणारा सरफराज खान अचानक आजारी पडल्याचे समोर येत आहे. आजारपणामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. मुंबईची विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये रविवारी (13 नोव्हेंबर) सर्विसेज संघासोबत लढत झाली. या सामन्यात सरफराज नसल्यामुळे संघाच्या एकंदरीत प्रदर्शनात देखील उणीवा पाहायला मिळाल्या. मुंबईने हा सामना 8 विकेट्सच्या अंतराने गमावला.
माध्यमांतील वृत्तांनुसार मुंबईचा महत्वाचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) आजारपणामुळे रात्रभर दवाखान्यात भरती होता. याच कारणास्तव तो रविवारी सर्विसेजविरुद्धच्या सामन्यासाठीही उपस्थित राहू शकला नाही. उभय संघांतील हा सामना रांचीमध्ये खेळला गेला होता. सरफराजचे वडील नौशाद खान यांनी त्याच्या दुखापतीविषयी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सरफराज मागच्या मोठ्या काळापासून किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्यामुळे त्रस्त आहे. याच कारणास्तव त्याला पुन्हा दवाखान्याचे तोंड पाहावे लागले आहे. असे असले तरी, आता त्याची तब्येत ठीक असल्याचेही सरफराजच्या वडीलांनी सांगितले.
वृत्तांनुसार सरफराज मुंबई संघासाठी त्यांचा पुढचा सामना खेळेल, असी आशा आहे. मुंबईला विजय हजारे ट्रॉफीमधील पुढचा सामना महाराष्ट्र संघासोबत खेळायचा आहे. रविवारी सर्विसेसविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर मुंबईने या सामन्यात 264 धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात सर्विसेज संघाने हे लक्ष्य 45.3 षटकांमध्ये 2 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. सरफराजने काही दिवासंपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कोलकातामध्ये 36 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. तसेच रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामात सरफराज सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
दरम्यान, सरफराज एकटाच असा खेळाडू नाहीये, जो मुंबई संघासाठी अनुपस्थित असेल. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील मुंबई संघाचे अजून दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हेदेखील विजय हजारे ट्रॉफीत उपस्थित नाहीत. भारतीय संघ सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि श्रेयस अय्यरला या दौऱ्यासाठी संघात निवडले संधी मिळाल्यामुळे तो विजय हजारे स्पर्धा खेळू शकणार नाही. तर दुसरीकडे शिवम दुबे गोलंदाजी करताना दुखापदग्रस्त झाला होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याला अनफिट घोषित केले गेले होते. त्याच्या जागी खिजर दफेदार याला संघात घेतले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले
आयसीसीने जाहीर केला टी20 विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा समावेश