कोविड-१९ या जागतिक महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. ही टी२० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर नुकताच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा आरंभ झाला आहे. परंतु आता या स्पर्धेवर कोरोना व्हायरसचे काळे सावट पसरले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३ वेगवेगळ्या संघांचा प्रत्येकी १ खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. या तिन्ही खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश या संघांचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील आठवड्यातच महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश संघाची कोरोना चाचणी झाली होती. या चाचणीदरम्यान दोन्ही संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा अहवाल सकारात्मक आला होता. तरीही या दोन्ही संघांना स्पर्धेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली होती.
बिहार संघानेही सोमवारी (२२ फेब्रुवारी) कर्नाटकविरुद्ध सामना खेळला होता. परंतु आता त्यांच्या संघातील एक खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्याने पूर्ण संघाची मंगळवारी नव्याने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत राहायला सांगितले गेले आहे. बिहार संघाच्या एका खेळाडूने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “आमची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी होणार आहे. तोवर आम्हाला आपापल्या खोलीत एकांतवासात राहण्यास सांगितले आहे. चाचणीनंतर आम्हाला पुढील योजनेची कल्पना दिली जाईल.”
तीन कोरोना चाचणीनंतर जैव सुरक्षित वातावरणात प्रवेशाची परवानगी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेची सुरुवात होण्यापुर्वीच सर्व संघांची ३ वेळा कोरोना चाचणी केली होती. या तिन्ही चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व संघांना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश देण्यात आला होता.
याबरोबरच बीसीसीआयने काही अटी लागू केल्या होत्या. ही स्पर्धा संपेपर्यंत सर्व खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. जर एखादा खेळाडू किंवा इतर व्यक्ती जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर गेला, तर त्याला स्पर्धेत पुन्हा सहभागी केले जाणार नसल्याचेही नियमात लिहलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अहमदाबाद कसोटीत कोहली रचणार इतिहास, धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाला काढणार मोडीत
दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम