भारतीय क्रिकेटपटू नमन ओझाचे वडील विनय ओझा यांना सुमारे 1.25 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी न्यायालयानं 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना शिक्षा सुनावण्यात आली. विनय ओझा यांना 7 वर्षांच्या शिक्षेसह 7 लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे.
2013 मध्ये मध्य प्रदेशातील जौलखेडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पैशांचा घोटाळा झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी एकूण 6 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. आता अखेर 11 वर्षांनंतर न्यायालयानं अभिषेक रत्नम, ज्याला या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हटलं जातं, त्याला दोषी ठरवलं आणि 10 वर्षांच्या कारावासाच्या व्यतिरिक्त 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला. विनय ओझा त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दोषी आढळल्यानंतर त्यांना 7 वर्षांचा कारावास आणि 7 लाख रुपयांचा दंड भोगावा लागला. मध्यस्थांची भूमिका बजावणाऱ्या धनराज पवार आणि लखन हिंगवे यांनाही 7 वर्षांच्या तुरुंगवासासह 7 लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
या घटनेचा मुख्य सूत्रधार अभिषेक रत्नम यानं बँक कर्मचाऱ्यांचे पासवर्ड वापरून ही फसवणूक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, नमन ओझा यांचे वडील विनय ओझा हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या त्याच शाखेत काम करत असून त्यांचा या फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं निष्पन्न झालं. तपास प्रक्रियेला बराच वेळ लागला आणि या दरम्यान शाखेत रोखपाल पदावर असलेले दीनानाथ राठोड यांचं निधन झालं. त्यांच्याशिवाय प्रशिक्षणार्थी ब्रॅन्च मॅनेजर नीलेश चटरोळे यांच्या आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करण्यात आला. या प्रकरणात नीलेश दोषी आढळला नाही.
अभिषेक रत्नम आणि विनय ओझा यांनी त्यांच्या एजंटांमार्फत बनावट खाती उघडून या माध्यमातून 1.25 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं वकील विशाल कोडळे यांनी उघड केलं. न्यायालयाने एकूण 6 पैकी 4 जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा –
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 115 धावांनी उडवला धुव्वा! 2-0 ने मालिका खिशात
वर्ल्डकप विजेता भारतीय क्रिकेटपटू बनला पिता, पत्नीने दिला मुलाला जन्म
IND vs AUS; गिल, पंत, जयस्वालबद्दल कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला….