भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने हा निर्णय जाहीर केला. त्याच्या या राजीनाम्यानंतर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे कर्णधारपदाची सूत्रे दिली जाऊ शकतात. तसेच, तो आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडेल. विराटच्या या निर्णयामागे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. आता याबाबत विराटने स्व:ता खुलासा केला आहे.
काय म्हणाला विराट
आयपीएलच्या प्ले ऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विराट एका मुलाखतीत बोलताना म्हणाला,
“नेतृत्व सोडण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे वर्कलोड आहे. मी जबाबदारीपासून पळ काढणारा व्यक्ती नाही. मी मैदानावर स्व:ताचे १२० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. हे योगदान मी देऊ शकलो नाही तर, त्या पदावर राहण्यात मी स्वारस्य दाखवणार नाही. नेतृत्व सोडल्यानंतर मी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. त्याचा संघाला निश्चितच फायदा होईल.”
सध्या विराटच्या नेतृत्वातील बंगलोर संघ आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये दाखल झाला असून, सोमवारी त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होईल. कर्णधार म्हणून अखेरच्या वेळी खेळत असताना, संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा त्याचा मानस असेल.
आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यात आलेले अपयश
विराट हा सन २०१४ पासून भारताच्या कसोटी संघाचा तर पासून मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला एकाही आयसीसी स्पर्धेत विजय नोंदवता आला नाही. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी व २०२१ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तर, २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. तसेच, २०१३ पासून तो बंगलोरला कर्णधार असताना, संघाला एकही विजेतेपद मिळाले नाही.