दोन वर्ष लांबत चाललेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) मंगळवारी (१७ ऑगस्ट) स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. या बहुप्रतीक्षित विश्वचषकात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार विराट कोहली याला एक मोठा पराक्रम करण्याची संधी या विश्वचषकात असेल.
विराटला हा पराक्रम करण्याची संधी
भारतीय संघ २०२१ टी२० विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात सुपर-१२ फेरीपासून पाकिस्तानविरुद्ध करेल. भारताला या गटामध्ये न्यूझीलंड व अफगाणिस्तान यांचेदेखील आव्हान पार करावे लागणार आहे. तसेच, पात्रता फेरीतील दोन संघांशी दोन सामने असे एकूण पाच सामने खेळण्याची संधी विराट व भारतीय संघाकडे असेल.
या पाच सामन्यांमध्ये विराटला टी२० विश्वचषकात १००० धावा काढण्याची संधी आहे. विराटने आत्तापर्यंत टी२० विश्वचषकात ७७७ धावा काढल्या असून आणखी २२३ धावा काढत तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज बनेल.
या खेळाडूंच्या नावे सर्वाधिक धावा
टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याच्या नावे आहे. जयवर्धने याने टी२० विश्वचषकात १०१६ धावा काढल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. या यादीमध्ये ९२० धावांसह दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल असून, तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने टी२० विश्वचषकात ८९७ धावा बनविल्या होत्या.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आयोजन
टी२० विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई येथे होणार आहे. सुरुवातीला ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा आयसीसीने यूएईला हलविली. स्पर्धेची सुरुवात ओमान येथे पात्रता फेरीने होईल. स्पर्धेची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी होऊन, अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट अँड कंपनीकडे तब्बल ३५ वर्षानंतर ‘असा’ पराक्रम करून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल