मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ४ मार्चपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खास असणार आहे. कारण हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असेल. त्यामुळे पंजाब क्रिकेट असोसिशन आणि बीसीसीआय त्याच्या १०० व्या सामन्यासाठी विशेष तयारी करत आहे. नुकताच बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांच्यासह काही आजी-माजी खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सचिनने सांगितले पहिल्यांदा विराटचे नाव कधी ऐकले
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) विराटला १०० व्या कसोटी सामन्याबद्दल (100 Test Match) शुभेच्छा देताना एक खास किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की, ‘मला आठवते, मी भारतीय संघात होतो आणि तेव्हा हे खेळाडू १९ वर्षांखालील विश्वचषक खेळत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल चर्चा व्हायची. तेव्हा सर्वजण म्हणायचे की, एक मुलगा आहे, विराट कोहली नावाचा. तो चांगली फलंदाजी करतो.’
पुढे सचिन म्हणाला, ‘मी आणि विराट नंतर एकत्र देखील खेळलो. पण खूप दिवस एकत्र फलंदाजी केली नाही, पण मला हे माहित होते, की तो शिकण्यासाठी नेहमी आतुर असतो. वेळेबरोबर तो खेळाला उच्च स्तरावर घेऊन गेला. त्याची फिटनेस चांगली आहे. तो पुढच्या पिढीला प्रेरणा देतो. हे मोठे यश आहे. आशा आहे की, तो पुढेही संघासाठी अनेक वर्षे खेळेल.’
विराटला अजून खूप काही मिळवायचे आहे – राहुल द्रविड
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) विराटबद्दल बोलताना म्हणाला, ‘कसोटी क्रिकेट खेळणे इतके सोपे नाही. हे एक असे शिखर आहे, ज्याबद्दल विराटला अभिमान वाटला पाहिजे. त्याने माझ्याबरोबर पण क्रिकेट खेळले आहे. सातत्याने त्याच्याच प्रगती झाली आहे आणि हे पाहून चांगले वाटते. त्याने गेल्या ५-६ वर्षे भारतीय संघाचे नेतृत्त्वही केले. ही सोपी गोष्ट नाही. मला वाटत नाही, की तो एवढ्या गोष्टींनी संतुष्ट होईल. त्याला अजून खूप काही मिळवायचे आहे.’
गांगुलीकडूनही विराटचे कौतुक
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने देखील विराटची पाठ थोपटली आहे. तो म्हणाला, ‘गेल्या १० वर्षातील त्याच्या कारकिर्दीकडे तुम्ही पाहाल, तर ती शानदार आहे. त्याला अजून खूप काही मिळवायचे आहे. त्याच्या क्रिकेट खेळण्यासाठी अजून खूप वर्षे उरली आहेत.’
विराटचे कौतुक करण्यासाठी सेहवागचा मजेदार अंदाज, वेंगसरकरांकडूनही कौतुक
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देखील विरेंद्र सेहवागचा (Virender Sehwag) गमतीशीर अंदाज पाहायला मिळाला. तो विराटचे कौतुक करताना म्हणाला, ‘पचनाची गोळी, सणांत होळी आणि फलंदाजीत कोहली, सर्व भारताला आवडतात. जेव्हा मी खेळाडू होतो, तेव्हा मी आकडेवारीबद्दल विचार करायचो नाही. माझे लक्ष्य १०० कसोटी खेळणारा पहिला दिल्लीचा खेळाडू होणे, हे होते. माझ्यानंतर इशांत शर्माने ही कामगिरी केली आणि आता विराट देखील हा पराक्रम करणार आहे. मी रणजी ट्रॉफीमध्ये त्याचे नेतृत्त्व केले आहे आणि त्याने देशासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे.’
तसेच दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) म्हणाले, ‘भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणे एक मैलाचा दगड आहे. त्याची जिद्द आणि दृढ संकल्पाने त्याने भारतासाठी इतका काळ खेळण्यासाठी प्रेरित केले आहे. तो एक शानदार खेळाडू आहे आणि अजून सहज पाच किंवा सहा वर्षे खेळू शकतो.’
हरभजन आणि इशांतनेही विराटवर उधळी स्तुतीसुमने
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला, ‘विराटने देशासाठी १०० सामने खेळणे ही मोठी कामगिरी आहे आणि या क्लबमध्ये त्याचे स्वागत आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. मला आशा आहे की, तू खेळाचा आनंद घेशील आणि पुढच्या पिढीला प्रेरीत करशील.’
तसेच बराच काळ विराटबरोबर एकत्र खेळणारा इशांत शर्मा (Ishant Sharma) म्हणाला, ‘तो एक महान खेळाडू आहे. त्याची आकडेवारी याचा पुरावा देते. मी त्याला वयाच्या १७ व्या वर्षापासून पाहिले आहे आणि त्याने देशासाठी शानदार प्रदर्शन केले आहे. मी त्याला शुभेच्छा देतो.’
https://twitter.com/BCCI/status/1499015631244443649
विराट १०० कसोटी खेळणारा १२ वा भारतीय
विराट कोहली भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि ईशांत शर्मा या भारतीय खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल: मुंबई सिटी एफसीचे आव्हान संपल्यात जमा, केरला ब्लास्टर्सचा दणदणीत विजय
महिला वनडे विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘पाकिस्तान भारताच्या आसपासही नाही’





