विराट कोहलीने गुरुवारी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून संपूर्ण क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की, तो टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारतीय टी-२० संघाची कमान सोडणार आहे. मग विराट कोहलीनंतर कोण भारतीय संघाचा टी-२० कर्णधार असेल, हा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. पण रोहित शर्मा या शर्यतीत सर्वात पुढे आहे. रोहित सध्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचे कारण म्हणून त्याच्यावर वाढलेला कामाचा ताण सांगितला. त्याने सांगितले की, गेली ५-६ वर्षे तो तिन्ही प्रकारामध्ये संघाची कमान सांभाळत आहे, त्यामुळे आता त्याला त्याच्या कामाचा ताण कमी करायचा आहे. आता विराट कोहली फक्त एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार असेल.
तसे तर, विराट कोहलीने त्याच्या कर्णधार म्हणून आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत अनेक यशाचे टप्पे गाठले आहेत. टी-२० मध्ये कर्णधार म्हणून त्याची आकडेवारीच याची साक्ष देत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, विराट कोहलीच्या टी२० कर्णधार म्हणून केलेल्या पाच मोठ्या विक्रमांबद्दल.
१. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा विराट कोहली एकमेव आशियाई कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ५-० असा पराभव केला होता. गेल्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात टी-१० मालिकेत २-१ ने पराभूत केले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ मध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव केला होता. तसेच २०१८ मध्येच दक्षिण आफ्रिकेचा २-१ ने पराभव केला होता.
२. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १७ पैकी १२ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. तर केवळ २ मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
३. विराट कोहलीने टी-२० कर्णधार म्हणून १५०२ धावा केल्या आहेत, जो भारतासाठी एक विक्रम आहे. त्याचबरोबर एरॉन फिंचनंतर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
४. विराट कोहली कर्णधार म्हणून सर्वात जलद १००० टी-२० धावा करणारा कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून फक्त ३० डावांमध्ये १००० धावा केल्या होत्या.
५. विराट कोहलीने कर्णधार म्हणून टी-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीने कर्णधार म्हणून १२ टी-२० अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
संजूच्या राजस्थान रॉयल्सला लिविंगस्टोन मिळवून देणार फायनलचं तिकीट! बजावेल महत्त्वाची भूमिका
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत