डॉमिनिका कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाचा दबदबा कायम राहिला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावत 312 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघाकडे 162 धावांची आघाडी आहे. डॉमिनिका कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी जयसवाल आणि विराट कोहली नाबाद राहिले. सध्या यशस्वी जयसवाल 350 चेंडूत नाबाद 143 धावांवर खेळत आहे, तर विराट 96 चेंडूत 36 धावांवर खेळत आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये 72 धावांची भागीदारी झाली आहे. तसेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने खास विक्रम रचला. यामध्ये त्याने दिग्गज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यालाही मागे टाकले.
विराट कोहलीचा विक्रम
भारतीय संघाकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) याने 5वा क्रमांक पटकावला. विराटने वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याला पछाडत ही कामगिरी केली. विराटने त्याच्या कसोटी कारकीर्दीत विंडीजविरुद्धच्या सामन्यापर्यंत 8515 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वलस्थानी असून त्याच्या नावावर 15921 धावा आहेत. तो कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. तसेच, भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याने कसोटीत 13265 धावा केल्या आहेत.
यादीत आणखी कुणाचा समावेश?
याव्यतिरिक्त या यादीत तिसऱ्या स्थानी सुनील गावसकर आहेत. त्यांनी कसोटी कारकीर्दीत 10122 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, कसोटी इतिहासात सर्वप्रथम 10000 धावांचा टप्पा पार करण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. यादीतील चौथ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. त्याने कसोटीत 8781 धावा केल्या आहेत. त्यानंतर आता विराटने 8515 धावांनी पाचवे स्थान काबीज केले आहे. यानंतर सेहवाग सहाव्या स्थानी घसरला असून त्याच्या नावावर 8503 धावांची नोंद आहे. (Virat Kohli 5h highest runs getters for india in test get past Virender Sehwag)
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
15921- सचिन तेंडुलकर
13265- राहुल द्रविड
10122- सुनील गावसकर
8781- व्हीव्हीएस लक्ष्मण
8515- विराट कोहली*
8503- वीरेंद्र सेहवाग
महत्वाच्या बातम्या-
यशस्वीनंतर रोहितचाही शतकी धमाका! टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेने
रेकॉर्डब्रेकर रोहित! थेट विरू आणि गावसकरांना मागे टाकत केला महापराक्रम