३ वर्षांपूर्वी विराट-रहाणेच्या भागीदारीचे कौतुक करणारा हा खेळाडू आज खेळतोय त्यांच्याच विरुद्ध

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 254 धावांची द्विशतकी तर उपकर्णधार अजिंक्य रहाणने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.

तसेच या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारीही रचली. त्यांच्या या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू तेंबा बाउमाची 3 वर्षांपूर्वीची एक इच्छा पूर्ण झाली आहे.

3 वर्षांपूर्वी 2016ला ऑक्टोबर महिन्यातच पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या कसोटीमध्ये विराट आणि रहाणेने चौथ्या विकेटसाठी 365 धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी विराटने 211 धावांची आणि रहाणेने 188 धावांची खेळी केली होती.

त्यावेळी बाउमाने ट्विट केले होते, ‘कोहली आणि रहाणे, या दोघांना दिवसभर खेळताना पाहू शकतो’

विशेष म्हणजे बाउमा आज तीन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा भाग असून तो पुण्यात सध्या सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळत आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 15 चेंडूत 8 धावा केल्या आहेत.

या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 275 धावा केल्या आहे. त्यामुळे भारताने पहिल्या डावात तब्बल 326 धावांची आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कर्णधार फाफ डूप्लेसिसने 64 धावांची तर केशव महाराजने 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच वर्नोन फिलँडरने नाबाद 44 धावा केल्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने 3, मोहम्मद शमीने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

You might also like