बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी संघ निवडणार आहे. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका पाहता सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीसाठी उपलब्ध असावेत, अशी निवड समितीची इच्छा आहे.
शुबमन गिल, केएल राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांना देखील दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आल्याचं कळतंय. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दीर्घ विश्रांती देण्यात आल्यानं तो ही स्पर्धा खेळणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराहच्या निवडीबाबतही निवड समिती चर्चा करणार आहे.
भारताला पुढील चार महिन्यांत ऑस्ट्रेलियात 5 कसोटी मालिकेसह एकूण 11 कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेश मालिकेतील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असतील. या मालिकेसाठी मोहम्मद शमीचं पुनरागमन होऊ शकतं. अशा स्थितीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. दुलीप ट्रॉफीचे सहा सामने 5 सप्टेंबरपासून सुरू होऊन 24 सप्टेंबरला संपतील. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळली जाणार आहे.
यंदाची दुलीप ट्रॉफी पूर्वीसारखी विभागीय स्वरूपात होणार नाही. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारत अ, भारत ब, भारत क आणि भारत ड या चार संघांची निवड करेल. दुलीप ट्रॉफी आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे खेळली जाणार आहे. हे ठिकाण हवाई वाहतुकीशी जोडलेलं नसल्यामुळे बीसीसीआय आता बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एक फेरी आयोजित करण्याची योजना आखत आहे.
निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी इशान किशनची देखील निवड करू शकते. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी किशननं देशांतर्गत क्रिकेट खेळावं, अशी निवड समितीची इच्छा आहे. रणजी ट्रॉफी न खेळल्यामुळे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना गेल्या वर्षी बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आलं होतं. अय्यरनं श्रीलंकेत नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेतून राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं, तर किशनला पुनरागमन करण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना दुलीप ट्रॉफीच्या कोणत्याही संघात स्थान मिळणार नाही. या दोन दिग्गजांचा भारतीय संघात परतण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. रहाणेच्या नेतृत्वात गेल्या मोसमात मुंबईनं रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं, परंतु फलंदाजीत त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पुजारानं धावा केल्या आहेत, मात्र युवा खेळाडूंच्या येण्यामुळे त्याला स्थान मिळणं अवघड आहे.
हेही वाचा –
केन विल्यमसन कर्णधार नाही! भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
कॅरेबियन पॉवर! षटकार अन् तोही 113 मीटर लांब….चेंडू पुन्हा दिसलाच नाही
बीजिंगपासून पॅरिसपर्यंत…ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंचा जलवा! अमन सेहरावतनं परंपरा राखली कायम