सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही दोन नावं जरी घेतली की जगाच्या कानाकोपऱ्यात असलेला कोणताही क्रिकेटप्रेमी हरखून जातो. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा असे एक ना अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर आहेत. त्यामुळेच विक्रमांचा विक्रम करणाऱ्या सचिनला क्रिकेट जगतात बहुसंख्य खेळाडू आदर्श मानतात. या यादीत खुद्द विराट कोहलीचाही समावेश होतो आणि अगदी सचिनच्याच पावलावर पाऊल ठेवत विराट विक्रमांचे नवनवीन मनोरे रचताना दिसला.
सचिनसोबत क्रिकेट खेळलेल्या सध्याच्या भारतीय संघातील काही खेळाडूंपैकी विराट कोहली आहे. त्यामुळेच मैदानावर आणि मैदानाबाहेर सचिन-विराट यांच्या जोडीचे अनेक रंजक किस्से प्रसिद्ध आहेत. या लेखातही आपण अशाच भन्नाट किस्स्यांबद्दल जाणून घेऊयात.
विराटने सचिनला दिलेले मौल्यवान गिफ्ट
विराट कोहलीला त्याच्या वडिलांनी दिलेला एक पवित्र धागा त्याने सचिनला दिला होता, तेव्हा तो सचिनचा कारकिर्दीमधला शेवटचा सामना होता. आपल्या शेवटच्या सामन्याची आठवण सांगताना स्वतः सचिन म्हणालेला, ‘ड्रेसिंग रुममध्ये मी एका कोपऱ्यात बसलो होतो आणि माझे अश्रू पुसत होतो. माझ्यासाठी तो क्षण खूप भावुक होता. त्यावेळी विराट माझ्या जवळ आला आणि त्याने मला एक पवित्र लाल धागा दिला, जो त्याला त्याच्या वडिलांनी दिला होता.’
पुढं बोलताना सचिनने सांगितले, ‘मी थोड्यावेळापर्यंत तो धागा माझ्याजवळ ठेवला आणि त्यानंतर पुन्हा तो विराटला परत केला. तेव्हा विराटला मी सांगितले की, हा धागा अमुल्य आहे आणि तो तुझ्याजवळ कायम राहिला पाहिजे, दुसऱ्यांकडे नाही. ही तुझी गोष्ट आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ही तुझ्याकडेच राहिली पाहिजे. तो भावनिक क्षण माझ्या आठवणीत कायम राहील.’
साधारण दोन वर्षांपूर्वी विराटनेही सचिनच्या अखेरच्या कसोटीची हीच आठवण सांगितली होती. त्याने या घटनेबद्दल सांगितले होते की, ‘आम्ही बऱ्याचदा मनगटाला धागे बांधतो. माझ्या वडिलांनी मला ते घालत असलेला धागा दिला होता. त्यामुळे मी तो माझ्या बॅगमध्ये ठेवायचो. मला तेव्हा वाटले होते की, ही एकच गोष्ट माझ्याजवळ आहे, जी की खूप मौल्यवान आहे. त्यामुळे मी यापेक्षा आणखी मौल्यवान काही देऊ शकत नव्हतो.’
हरभजन, युवराज आणि विराटने सचिनसाठी गायलेले गाणे
हा किस्सा होता २०११ सालच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यानंतरचा. या सामन्यातील एमएस धोनीचा षटकार सर्व भारतीयांच्या मनात घर करून गेला होता… कारण तो साधासुधा षटकार नव्हता, तर सामना जिंकणारा षटकार होता. श्रीलंकेविरुद्ध जेव्हा भारताने २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला, तेव्हा मैदानावर हरभजन आणि युवराजला अश्रू अनावर झाले होते. विजयानंतर संपूर्ण टीम ताज हॉटेलमध्ये होती. तिथे हरभजन, विराट अन् युवराजने सचिनसाठी ‘तुझमें रब दिखता है, यारा मैं क्या करूं…’ हे गाणं गायलं होते. हा किस्सा खुद्द विराटने एका शोदरम्यान सांगितला होता.
तो म्हणाला होता की, ‘सामना जिंकल्यानंतर आम्ही ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही एका खोलीत होतो, मजा-मस्ती आणि डान्स करत होतो. तेव्हा मी, युवराज आणि हरभजन सिंग आपल्या गुडघ्यावर बसलो आणि गाणं वाजलं तुझमें रब दिखता हैं… हे गाणं आम्ही त्याच्यासाठीच गायलं होतं.’
https://twitter.com/Leg_glance/status/1494308065566666755
सचिनने विराटचं नाव पहिल्यांदा कधी ऐकलं होतं?
‘किंग कोहली’ म्हणजेच विराटच्या १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत सचिनने विराटला १०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देत त्याचं नाव पहिल्यांदा केव्हा ऐकलं होतं, ते सांगितले होते. यात सचिन म्हणाला होता की, “अभिनंदन विराट… २००७ साली जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो, तेव्हा तुझं नाव ऐकलं होतं. तू तेव्हा १९ वर्षांखालील विश्वचषकात इंडोनेशियाविरुद्ध खेळत होता. त्यावेळी संघातील काही खेळाडू तुझ्याबद्दल बोलत होते की, हा एक खेळाडू आहे, ज्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. चांगली बॅटिंग करतो. त्यानंतर आम्ही भारतासाठी एकत्र क्रिकेट खेळलो. फार काळ नाही, पण आपण जेवढा वेळ खेळलो, तेव्हा मला तुझ्यात ती जिद्द दिसली. आपला खेळ कसा चांगला करता येईल, त्यासाठी झटताना पाहिलं. गोष्टी लवकर शिकणे ही तुझ्यातील शक्ती होती.”
याचवेळी विराटच्या फिटनेसबद्दल सांगताना सचिन म्हणाला होता की, “२०११ साली ऑस्ट्रेलियात असताना कॅनबेराच्या एका रेस्टॉरंटवर जायचो. एके दिवशी तिथं जेवण केल्यानंतर आम्ही हॉटेलकडे वळलो. खूपच जेवण झालं होतं. तेव्हा विराट म्हणाला होता की ‘पाजी खूप झालं. आता फिटनेसवर लक्ष द्यायचंय. मला हे सांगितलंच पाहिजे की, त्यानंतर तू मागे वळून पाहिलंच नाही. तू फिटनेसच्या बाबतीत रोल मॉडेल बनला. आकड्यांची वेगळी स्टोरी असते. पण तुझी खरी ताकद ही युवा खेळाडूंना प्रेरित करणे आहे. तसेच तू भारतीय संघासाठी दिलेले योगदान हे तुझे यश आहे.”
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
Welcome to the 1⃣0⃣0⃣-Test club Virat Kohli 👏 👏#TeamIndia greats share their thoughts on @imVkohli's landmark Test, his achievements & the impact he's had on Indian cricket. 🔝 👍
Watch the full feature 🎥 🔽https://t.co/m135xwB2zt pic.twitter.com/gzN71BZnCn
— BCCI (@BCCI) March 2, 2022
विराटने धरले होते सचिनचे पाय
भारतीय खेळाडूंनी विराटचा प्रँक करत त्याला सचिनच्या पाया पडायला लावले होते. विराटने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले होते, तेव्हा युवराज सिंग, हरभजन सिंग तसेच इरफान पठाण आणि मुनाफ पटेल या चौघांनी मिळून विराटला सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये सचिन पाजी जेव्हा पण दिसतील तेव्हा तू त्यांच्या पाया पडायचे. प्रथमच संघात सामील झालेला प्रत्येक खेळाडू सचिनकडून असेच आशीर्वाद घेतो. ही आमची परंपरा आहे व ही सर्वांनीच बजावली आहे. आता तुझी पाळी. युवा विराटला हा विनोद असू शकतो याची कल्पना देखील नव्हती. त्याने ते खरे मानले आणि त्याने सचिनचे पाय धरले. पण, नंतर सचिनने त्याला लगेचच असे करू नको सांगितले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या अष्टपैलूला राजस्थान रॉयल्सने दिली संधी, पाहा त्याची कारकीर्द
एवढ्या धावा कोण देतं? यंदाच्या हंगामात फलंदाजांपुढं गुडघे टेकणारे ५ गोलंदाज; सिराज अव्वलस्थानी
सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू! कशी राहिली त्याची क्रिकेटमधील आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर