भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. या सामन्यात ७३ धावांची खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने कर्णधार म्हणून आणखी एका विक्रमला गवसणी घातली.
विराटने खेळली शानदार खेळी
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने ५६ धावांची लाजवाब खेळी केली. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर टीकेला सामोरा गेलेला कर्णधार विराट कोहली या सामन्यात चमकला. त्याने नाबाद ७३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. याच खेळी दरम्यान विराटने कर्णधार म्हणून १२,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
दिग्गजांच्या यादीत झाला समाविष्ट
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२००० धावा करणारा अवघा तिसरा कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५,४४० धावा बनविल्या आहेत. त्यापाठोपाठ, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने कर्णधार या नात्याने १४,८७८ धावा जमा केल्या आहेत. या यादीत चौथ्या व पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. दोघांनी अनुक्रमे ११,५६१ व ११,२०७ धावा काढल्या आहेत.
भारताचा एकतर्फी विजय
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडतर्फे जेसन रॉयने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कर्णधार ओएन मॉर्गन(२८) व बेन स्टोक्सच्या(२४) उपयुक्त खेळ्यांमुळे इंग्लंडने १६४ धावांची मजल मारली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, भारताने पहिल्याच षटकात केएल राहुलचा बळी गमावला. त्यानंतर, ईशान किशन व कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९४ धावा जोडत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. ईशान अर्धशतक करून माघारी परतल्यानंतर रिषभ पंतने १३ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी खेळली. अखेर श्रेयस अय्यरसोबत मिळून विराटने भारतीय संघाला विजयी रेषेपार नेले. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (१६ मार्च) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
विजयी षटकार ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर
इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय
Video: अरेरे, भावा चेंडू तरी नीट पकडायचा! बेन स्टोक्सने ‘असा’ सोडला इशानचा सोपा झेल