18 ऑगस्ट 2008 रोजी 19 वर्षांचा एक मुलगा श्रीलंकेतील डंबुला येथे भारतीय क्रिकेट संघासाठी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. मात्र अंडर-19 वर्ल्डकपमध्ये त्यानं आपल्या नावाची खळबळ आधीच माजवली होती. या खेळाडूचं नाव होतं विराट कोहली. पदार्पणाच्या सामन्यात विराट काही खास करू शकला नाही, परंतु काहीतरी साध्य करण्याच्या जिद्दीमुळे आज तो भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा स्टार बनला आहे.
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यान त्यानं एकामागून एक अनेक रेकॉर्ड मोडले. या बातमीत आपण त्याच्या अशा पाच खास विक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची वर्षानुवर्षे चर्चा होत राहील.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं – एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं झळकावणारा विराट कोहली हा जगातील पहिला फलंदाज आहे. 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्यानं ही कामगिरी केली होती. विराटनं 113 चेंडूत 117 धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडला. सध्या एकही क्रिकेटपटू विराटच्या या विक्रमाच्या आसपासही नाही.
एक विश्वचषकात सर्वाधिक धावा – एकाच वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावे आहे. विराटनं 2023 एकदिवसीय विश्वचषकात 11 डावात 765 धावा ठोकल्या होत्या. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्यानं 2003 विश्वचषकात 11 डावात एकूण 673 धावा केल्या होत्या. कोहलीनं 2023 विश्वचषकात 95.62 ची सरासरी आणि 90.31 च्या स्ट्राइक रेटसह तीन शतकं आणि सहा अर्धशतकं झळकावली.
सर्वात जास्त वेळा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ – विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वात जास्त वेळा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ जिंकण्याचा विक्रम आहे. विराटनं आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 533 आंतरराष्ट्रीय सामने, ज्यापैकी 161 मालिकांमध्ये तो 21 वेळा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ बनला आहे. यामध्ये 11 वनडे, 7 टी20 आणि 3 कसोटी मालिकांचा समावेश आहे. या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं 20 वेळा ही कामगिरी केली आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 13000 धावा – एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13000 धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं अवघ्या 267 डावात ही कामगिरी केली. विराटनं हा पराक्रम सप्टेंबर 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यात केला होता. वनडेमध्ये सर्वात जलद 13000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिननं 321 डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं – टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यानं टी20 मध्ये 38 अर्धशतकांसह आपली कारकीर्द संपवली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत 36 अर्धशतकं आणि तीन शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
भारतीय खेळाडूमध्ये दिसला धोनीचा अवतार! अखेरच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकून बनवलं टीमला चॅम्पियन
काय सांगता! तब्बल 11 खेळाडू शून्यावर बाद, तरीही हा विश्वविक्रम कायमच!
दिलदार श्रेयस! रस्त्यावरील गरीब महिलेची मदत करून जिंकलं सर्वांचं मन