मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा (२९) आणि मयंक अगरवाल (३३) यांनी अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात केली होती. मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघेही बाद झाले. पण, नंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी ९० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला.
दरम्यान, विराट कोहलीने ३९ व्या षटकातील विश्वा फर्नांडोने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेतली आणि ३८ धावा पूर्ण केल्या; याबरोबरत त्याने ८००० कसोटी धावांचा (8000 Test Runs) टप्पा पूर्ण केला. हा कारनामा करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांनी असा कारनामा केला आहे.
याबरोबरच विराट सर्वात जलद ८००० कसोटी धावा करणारा पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने १६९ डावात ८००० कसोटी धावा पूर्ण केल्या. या यादीत अव्वल क्रमांकावर सध्या सचिन तेंडुलकर आहे. सचिनने १५४ कसोटी डावात ८००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल द्रविडने १५८ डावात आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विरेंद्र सेहवागने १६० डावात ८००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच चौथ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत, त्यांनी १६६ डावात ८००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. या विक्रमाच्या यादीत विराट पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. त्याने २०१ डावात ८००० धावा केल्या.
.@imVkohli breaches another milestone on his momentous day.
8000 and counting runs in whites for him 👏👏#VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/EDZz9kPZwy
— BCCI (@BCCI) March 4, 2022
विराटसाठी खास सामना
विराटसाठी हा सामना आणखी खास आहे. कारण हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे. तो १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय आणि एकूण ७१ वा खेळाडू ठरला आहे. मात्र, विराट या सामन्यात पहिल्या डावात ४५ धावांवर बाद झाला. त्याला लसिथ एम्बुल्डेनिया याने ४४ व्या षटकात त्रिफळाचीत केले. विराटने आत्तापर्यंत १०० कसोटी सामन्यांमध्ये १६९ डावात ५०.३५ च्या सरासरीने ८००७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २७ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५९२१ धावा – सचिन तेंडुलकर (२०० सामने)
१३२६५ धावा – राहुल द्रविड (१६३ सामने)
१०१२२ धावा – सुनील गावसकर (१२५ सामने)
८७८१ धावा – व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ सामने)
८५०३ धावा – विरेंद्र सेहवाग (१०३ सामने)
८००७ धावा – विराट कोहली (१०० सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड
आयपीएल २०२२ ची जाहिरात लॉन्च! पाहा धोनीचा ‘जबरा स्वॅग’
कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद