भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर २२७ धावांनी विजय मिळवला होता. यात कर्णधार जो रुटने २१८ धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यात आर आश्विनच्या शतकीय खेळीमुळे भारतीय संघाने सामना ३१७ धावांनी जिंकला होता. अशातच तिसरा कसोटी सामना जिंकून कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नवीन विक्रम जमा होऊ शकतो.
अहमाबादमधील मोटेरा मैदानावर खेळवण्यात येणारा तिसरा कसोटी सामना हा डे-नाईट सामना असणार आहे. अशातच हा सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करेल. तसेच कर्णधार कोहलीकडे माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या पुढे जाण्याची देखील संधी आहे. सध्या दोघांकडे मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये २१-२१ विजय आहेत. जर हा सामना भारतीय संघाने जिंकला, तर कोहली २२ विजयासोबत मायदेशात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार ठरेल.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात एकूण २८ कसोटी सामने खेळले आहेत. यात २१ वेळेस भारतीय संघ विजयी झाला आहे. तर २ सामन्यात पराभव आणि उर्वरित ५ सामने अनिर्णित सुटले होते. दुसरीकडे धोनीने मायदेशात एकूण ३० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात त्यालादेखील २१ सामन्यात संघाला विजय मिळवून देता आला आहे. तर ३ सामने संघाला गमवावे लागले आणि ६ सामने अनिर्णीत राहिले होते.
इतर भारतीय कर्णधारांविषयी बोलायचे झाले तर, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात २१ कसोटी सामने खेळले होते. ज्यात १० सामन्यात भारतीय संघ विजयी झाला होता. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि ८ सामने अनिर्णीत राहिले होते. तर मोहम्मद अजहरुद्दिन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात २० कसोटी सामन्यातून १३ कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. तर ४ कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता आणि ३ कसोटी सामने अनिर्णीत सुटले होते.
तसेच सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मायदेशात २९ कसोटी सामने खेळले होते. यात त्यांना ७ सामने जिंकवून देण्यात यश आले होते. यात २ सामन्यात त्यास पराभवाचा सामना करावा लागला होता आणि २० सामने ड्रॉ राहिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
शंभराव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असलेला इशांत शर्मा म्हणाला, ‘…तर मी शंभर कसोटी खेळू शकलो नसतो’
“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया