भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पुणे येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांमध्ये ३३६ धावा बनवल्या. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात देखील अर्धशतक साजरे केले. मात्र, ६६ धावांवर बाद होताच त्याच्या नावे एक आगळावेगळा विक्रम जमा झाला.
विराटचे सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक
भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी२० मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावल्यानंतर वनडे मालिकेतही तो धावांची बरसात करत आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती.
दुसऱ्या सामन्यातही शिखर धवन व रोहित शर्मा हे भारताचे सलामीवीर ३७ धावांमध्ये तंबूत परतल्यानंतर त्याने केएल राहुलसोबत संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२१ धावांची भागीदारी केली. विराट या सामन्यात ६६ धावा काढून आदिल रशीदच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देत बाद झाला.
विराटचा आगळावेगळा विक्रम
विराटने ६६ धावांवर बाद होताच न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या एका आगळ्यावेगळ्या विक्रमाची बरोबरी केली. विराट आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत आत्तापर्यंत ६ वेळा ६६ या धावसंख्येवर बाद झाला आहे. फ्लेमिंग हा देखील आपल्या कारकीर्दीत सहा वेळा ६६ धावा काढून बाद झाला होता.
भारताचा धावांचा डोंगर
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर लवकर परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. राहुलने दमदार शतक ठोकत भारताच्या डावाचे नेतृत्व केले. विराटव्यतिरिक्त रिषभ पंतने आक्रमक अर्धशतक (७७) झळकावत ठोकले. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने १६ चेंडूत ३५ धावांचा तडाखा दिला. इंग्लंडसाठी रिस टोप्ली व टॉम करन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडचा विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ना विराट ना रोहित; कोणत्याही सक्रिय भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम राहुलच्या नावावर
स्टोक्सवर भडकले पंच, मागावी लागली माफी; जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण
अन् राहुलच्या फ्लॉप शोवर पूर्णविराम! शतक केल्यानंतर पकडले कान, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ