तिरुअनंतरपुरम। रविवारी(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 8 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारताने पराभव स्विकारला असला तरी भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने(Shivam Dube) शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी केली. त्याला या सामन्यात फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.
त्यानेही या संधीचा पुरेपुर फायदा घेत 30 चेंडूत 54 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले आहे.
त्याचबरोबर शिवमने भारताचा कर्णधार विराट कोहलीसह(Virat Kohli) तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारीही रचली.
पण या सामन्यात अनेकांना शिवमला तिसऱ्या क्रमांवर फलंदाजीला पाठवण्याचे आश्चर्य वाटले. परंतू या योजनेमागील कारण विराटने सामन्यानंतर स्पष्ट केले.
विराट म्हणाला, ‘आम्हाला माहित होते की खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल. त्यामुळे आम्ही विचार केला की शिवमला लवकर पाठवू आणि त्याला फिरकीपटूंवर आक्रमण करु दे. हीच आमची योजना होती. जी चांगल्याप्रकारे अंमलात आली.’
शिवमने त्याच्या अर्धशतकी खेळीत कायरन पोलार्डने टाकलेल्या 9 व्या षटकात 23 धावा काढल्या. तसेच या षटकात पोलार्डने 3 वाईड चेंडू टाकल्याने या षटकात एकूण 26 धावा भारताला मिळाल्या.
या सामन्यात भारताने शिवमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 170 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिजला 171 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हाना पाठलाग वेस्ट इंडिजने 18.3 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला.






