रविवारी (21 एप्रिल) आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना झाला. या सामन्यात केकेआरनं 1 धावेनं अत्यंत रोमांचक विजय नोंदवला.
अटीतटीच्या लढतीशिवाय हा सामना विराट कोहलीच्या वादग्रस्त विकेटवरूनही चांगलाच चर्चेत आहे. सामन्यादरम्यान संयम गमावल्यामुळे बीसीसीआयनं कोहलीला आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आलाय.
आरसीबीच्या डावातील तिसऱ्या षटकात ही घटना घडली. प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं आरसीबीसमोर 223 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात, विराट कोहलीनं सलामीला येऊन 7 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणानं त्याचा स्वत:च्याच गोलंदाजीत झेल घेतला.
वास्तविक, हर्षित राणानं फुल टॉस चेंडू टाकला होता, जो कोहलीच्या मते नो-बॉल होता. अंपायरनं आऊट दिल्यानंतर कोहलीनं रिव्ह्यू घेतला. हॉक-आय सिस्टीममध्ये असं आढळून आलं की, जर कोहली क्रीजच्या आत उभा राहिला असता तर चेंडू त्याच्या कमरेच्या खाली गेला असता. मात्र तो क्रीजच्या बाहेर उभा असल्यानं कमरेच्या वर चेंडू येऊनही अंपायरनं त्याला बाद दिलं. या निर्णयानंतर कोहलीनं मैदानावर अंपायरशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
विराट कोहलीनं काही वेळ अंपायरशी वाद घातला. मात्र तरीही त्याचा राग शांत झाला नव्हता. कोहली ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यावर त्यानं बॅट जमिनीवर फेकली. यानंतर त्यानं डस्टबिनला जोरदार मुक्का मारून आपला संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. विराट कोहली बाद की नाबाद? अशा चर्चांना ऊत आला आहे. अनेकांच्या मते, तो नो बॉल होता आणि कोहलीला बाद देणं चुकीचं होतं. तर अनेकांनी पंचांच्या निर्णयाची पाठराखण केली आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंची देखील यावर वेगवेगळी मतं आहेत.
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी अंपायरच्या निर्णयावर टीका करत विराट कोहली बाद नव्हता असं म्हटलंय. तर इरफान पठाननं याच्या उलट, अंपायरचा निर्णय योग्य असून, विराट कोहली बाद होता असं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानावर कुणी घेतला रोहित शर्माचा मुका? ‘हिटमॅन’नं पुढे काय केलं? पाहा VIDEO
आयपीएलच्या झगमगाटापासून दूर ‘या’ भारतीय खेळाडूनं कौंटी क्रिकेटमध्ये ठोकलं नाबाद द्विशतक
“ना फलंदाजीत, ना गोलंदाजीत, त्याचा संघात काहीच उपयोग नाही”; सेहवागनं घेतला सॅम करनचा क्लास