विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) आयपीएल २०२१ मधील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध झालेल्या या सामन्यात आरसीबीला ६९ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे आरसीबीची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. याचबरोबर कर्णधार विराट कोहलीसाठी देखील एक वाईट बातमी आली.
विराटला ठोठावला गेला दंड
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात आरसीबीला पराभूत व्हावे लागले. त्याचबरोबर, संथ गतीने षटके टाकल्याने संघाचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिल्या गेलेल्या वृत्तानुसार,
‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने षटके टाकल्यामुळे आयपीएलच्या नियमानुसार १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला.’
विराटवर यापूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील याच कारणासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
आयपीएल २०२१ मधील चौथा कर्णधार
आयपीएल २०२१ मध्ये संथ गतीने षटके टाकल्यामुळे दंड झालेला विराट चौथा कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी याला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार यालादेखील दिल्ली विरुद्धच तर, केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धिम्या गतीने षटके टाकल्यामुळे प्रत्येकी १२ लाखांचा दंड आकारला गेला होता.
असा आहे नियम
आयपीएल २०२१ मध्ये संघांनी ९० मिनिटांमध्ये २० षटके संपवावी असा नियम बीसीसीआयने घालून दिला आहे. यामधून टाईम आऊट व इतर वेळास वगळले गेले आहे. वेळात षटके पूर्ण झाली नाहीत तर, पहिल्या वेळी कर्णधाराला १२ लाख रुपयांचा दंड लावला जातो. हीच चूक दुसऱ्यांदा झाल्यास २४ लाख तर, तिसऱ्यांदा या प्रकरणात दोषी आढळल्यास कर्णधारावर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अशी’ ऐतिहासिक कामगिरी करणारा जड्डू पहिला खेळाडू नाही, सीएसकेच्याच सहकाऱ्याने रचला होता इतिहास
पंतचा मोठा विक्रम! श्रेयस अय्यरला तर मागे टाकलेच पण यष्टीरक्षक म्हणून धोनी, गिलख्रिस्टलाही ठरला भारी
सर जडेजाला तोड नाही! बंगलोरविरुद्धच्या अष्टपैलू कामगिरीने ‘या’ खास यादीत मिळवले स्थान