इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. ट्रेंट ब्रिज मैदानावर होत असलेल्या या सामन्याचा गुरुवारी दुसरा दिवस होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीरांनी संयमी फलंदाजी करत भारताला ठोस सुरुवात दिली. मात्र, त्यानंतर अचानकपणे भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्याच चेंडूवर बाद होत ‘गोल्डन डक’ ठरला. यासोबतच त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
विराट पहिल्याच चेंडूवर झाला बाद
भारतीय सलामीवीरांनी ९७ धावांची चांगली सुरुवात झाली होती. मात्र, ओली रॉबिन्सनने रोहितला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. पहिला गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला पाचारण केले. भारतीय डावातील ४१ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने चेतेश्वर पुजाराला झेलबाद केले. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. सर्व क्रिकेटप्रेमींना आणि भारतीय संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, अँडरसनच्या सुरेख चेंडूवर तो चकला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती विसावला.
अशी नकोशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
कर्णधार म्हणून पहिल्या चेंडूवर बाद होण्याची (गोल्डन डक) विराटची कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी वेळ आहे. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डक होणारा भारतीय कर्णधार बनला आहे. यापूर्वी लाला अमरनाथ, कपिल देव व सौरव गांगुली हे भारताचे माजी कर्णधार प्रत्येकी दोन वेळा गोल्डन डक झाले होते.
विराटला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार असताना गोल्डन डक करणारे पहिले दोन गोलंदाज अनुक्रमे इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (२०१८) व वेस्ट इंडिजचा केमार रोच (२०१९) हे होते. कसोटी क्रिकेटमध्ये गोल्डन डक होण्याची विराटची पाचवी वेळ आहे. २०११ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी बेन हिल्फेनहॉस तर, २०१४ इंग्लंड दौऱ्यावर लियाम प्लंकेटने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता
Video: आवडत्या शॉटनेच केला रोहितचा घात, ‘असा’ झाला ३६ धावांवर बाद
“टीम इंडियाने कसोटी चॅम्पियशीप फायनलमधील चूका सुधारल्या”, माजी दिग्गज वेगवान गोलंदाजांवर खूश