ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या २१० धावांवर संपुष्टात आला. या ऐतिहासिक विजयानंतर विराटने रोहितला नव्हे, तर दुसऱ्याच खेळाडूला विजयाचे श्रेय दिले आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यात जोरदार सुरुवात करून दिली होती. तसेच चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले होते.
तसेच चेतेश्वर पुजारा सोबत मिळून महत्वाची दीडशतकी भागीदारी केली होती. ज्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात मोठी आघाडी घेतली होती. याच खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. परंतु, विराटच्या मते रोहित शर्माबरोबरच शार्दुल ठाकूरने देखील हा सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
विराट कोहलीने सामना झाल्यानंतर म्हटले की, “शार्दुल ठाकूर सामन्यातील मोठा फरक होता. त्याने खालच्या फळीत आणि मधल्या फळीत प्रभाव पाडणारी कामगिरी केली.” ईशांत शर्माच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. असे म्हटले जात होते की, ईशांत शर्माऐवजी आर अश्विनला संधी दिली जाईल. परंतु शार्दुल ठाकूरला संधी दिली गेली होती. या संधीचे सोने करत त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.
शार्दुलची अष्टपैलू कामगिरी
शार्दुल ठाकूरला वेगवान गोलंदाज म्हणून या संघात संधी देण्यात आली होती. परंतु, त्याने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या डावात भारतीय संघ अडचणीत असताना शार्दूलने तुफानी अर्धशतक झळकावत ५७ धावांचा खेळी करून भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.
तसेच दुसऱ्या डावात देखील त्याने ६० धावांची खेळी केली. यासह रिषभ पंत सोबत मिळून त्याने महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून दिली होती. तसेच गोलंदाजी करताना देखील त्याने ३ गडी बाद केले. मुख्य बाब म्हणजे त्याने जो रूटला एकाच सामन्यात दोन वेळेस त्रिफळाचित केले.
महत्त्वाच्या बातम्या –
मँचेस्टर कसोटीत ‘हिटमॅन’ मैदानात उतरणार का? दुखापतीबाबत स्वतः रोहित शर्माने दिली मोठी अपडेट
आयपीएल पदार्पणासाठी ‘हे’ सात खेळाडू आहेत सज्ज; १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात झालेत सामील
नडला त्याला तोडला! पुजाराला डोळे दाखवणाऱ्या ओव्हरटनचा उमेश यादवने ‘असा’ घेतला बदला