दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (८ नोव्हेंबर) भारत विरुद्ध नामिबिया संघात सामना झाला. सुपर १२ फेरीतील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेकीवेळी विराटने भविष्यात भारताच्या टी२० संघाचा कर्णधार कोण होईल, याबद्दल संकेत दिले.
भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांसाठी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील हा अखेरचा सामना होता. कारण भारत आणि नामिबिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत. तसेच उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चार संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
असे असले तरी हा सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास होता. कारण हा त्याचा भारताचा टी२० कर्णधार म्हणून ५० वा सामना होता, त्याचबरोबर टी२० कर्णधार म्हणून अखेरचा सामना देखील होता. त्याने ही स्पर्धा सुरू होण्याच्याआधीच स्पष्ट केले होते की, टी२० विश्वचषकानंतर तो भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा पुढील टी२० कर्णधार कोण होणार यावर चर्चा होत आहे.
दरम्यान, विराटने नाणेफेकीवेळी रोहित भविष्यातील कर्णधार होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. विराट नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाला, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. नाणेफेक महत्त्वाचा घटक आहे आणि मी गेले २ नाणेफेक जिंकल्यानंतर तोच निर्णय घेतला, जो आम्हाला पहिल्या दिवसापासून घ्यायचा होता.’
विराट पुढे टी२० कर्णधारपदाबद्दल बोलताना म्हणाला, ‘भारताचे नेतृत्व करणे सन्मानाची गोष्ट आहे आणि मी माझे सर्वोत्तम यासाठी दिले. दीर्घकाळाच्या प्रकारासाठी (कसोटी) सर्वात लहान प्रकाराला (टी२०) मार्ग मोकळा करावा लागतो. मला जी संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता भारतीय संघाला पुढे नेण्याची दुसऱ्याची वेळ आहे. तरीही, यासाठी रोहितकडे पाहिले जात आहे, आणि भारतीय संघ चांगल्या हातात आहे.’
विराटची टी२० कर्णधार म्हणून कामगिरी
साल २०१७च्या सुरुवातील एमएस धोनीने मर्यादीत षटकांच्या भारतीय संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. विराटने सर्वप्रथम भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व २६ जानेवारी २०१७ रोजी इंग्लंडविरुद्ध कानपूर येथे केले होते. तेव्हापासून तो नियमितपणे ही जबाबदारी सांभाळत होता.
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ५० टी२० सामने खेळले आहेत. त्यातील २९ सामने सामने जिंकले असून १६ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराटची अनोखी ‘फिक्टी’
कडक फिल्डींग! न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने मागील बाजून डाईव्ह मारत अडवला षटकार, व्हिडिओ व्हायरल
पद्म पुरस्कारांचे झाले वितरण; क्रीडाक्षेत्रातील पीव्ही सिंधू, मेरी कोमसह ‘हे’ ८ मान्यवर ठरले मानकरी