मोहाली। बुधवारी(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सहज विजय मिळत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20 मधील 22 वे अर्धशतक आहे. या अर्धशतकाबरोबरत त्याने दोन विश्वविक्रमही केले आहेत.
विराट आता संघसहकारी रोहित शर्माला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 71 सामन्यात 50.85च्या सरासरीने 2441 धावा केल्या आहेत.
याआधी हा विक्रम रोहितच्या नावावर होता. पण रोहित या सामन्यात 12 धावांवरच बाद झाल्याने त्याच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 97 सामन्यात 32.45 च्या सरासरीने 2434 धावा झाल्या आहेत. तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराटच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हा विश्वविक्रमही झाला विराटच्या नावावर –
विराटने बुधवारी आंतरराष्ट्रीय टी20मधील कारकिर्दीतील 22वी अर्धशतकी खेळी केल्याने तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी हा विश्वविक्रम विराट आणि रोहित यांच्या नावावर संयुक्तरित्या होता. पण आता विराटने रोहितला मागे टाकले आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 21 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
2441 धावा – विराट कोहली (71 सामने)
2434 धावा – रोहित शर्मा (97 सामने)
2283 धावा – मार्टिन गप्टिल (78 सामने)
2263 धावा – शोएब मलिक (111 सामने)
2140 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू –
22 – विराट कोहली (71 सामने)
21 – रोहित शर्मा (97 सामने)
16 – मार्टिन गप्टिल (78 सामने)
15 – ख्रिस गेल (58 सामने)
15 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विनेश फोगटने जिंकले कांस्यपदक; टोकियो ऑलिंपिकसाठीही ठरली पात्र
–कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव






